कोल्हापूर : युवतींनी केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे नाही, तर मानसिकदृष्ट्याही सक्षम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. भारती पाटील यांनी केले. न्यू कॉलेजमध्ये सुरू असलेल्या महाविद्यालयीन युवती स्वसंरक्षण शिबिरात ‘महिला मुक्ती चळवळ’ या विषयावर त्या बोलत होत्या. पाटील म्हणाले, त्रास देणाऱ्या व छेडछाड करणाऱ्या युवकांविरुद्ध शिक्षक व महाविद्यालयाचे प्रशासन यांना घेऊन आवाज उठविण्याचे धाडस युवतींनी दाखविले पाहिजे. तुमच्या आत्मसन्मानाला धक्का देणाऱ्या गोष्टींना ‘नाही’ म्हणायला शिका, असे आवाहन त्यांनी केले. ‘मी असे घडले’ या सदरात श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, उत्तम आरोग्यासाठी सकस आहार घेऊन व्यायाम केला पाहिजे. कुटुंबातील व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोलावे. मुलींसाठी स्वतंत्र तक्रारपेटी ठेवून महाविद्यालयाने समुपदेशनाची व्यवस्था केली पाहिजे. दुपारच्या सत्रात मेजर डॉ. रूपा शहा म्हणाल्या, शिस्त, एकता, संवेदनशीलता आयुष्यात महत्त्वाची असते. स्वत:ची निर्णयक्षमता विकसित करून ध्येयाकडे वाटचाल करावी. दुसऱ्याला मदत करण्याची सवय लावून घ्या. विद्या देसाई यांनी प्रास्ताविक केले. रेश्मा पाटील हिने आभार मानले. सकाळाच्या सत्रात सुप्रिया पाटील व मनौती पोवार यांनी सूर्यनमस्कार घेतले. सायंकाळी सुषमा पाटोळे यांनी ज्यूदोचे प्रशिक्षण दिले. यावेळी प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे, डॉ. ए. जी. सूर्यवंशी, प्रा. सी. एम. गायकवाड, माजी प्राचार्य आर. डी. पाटील, गिरीश फोंडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
युवतींनो, भावनिकदृष्ट्याही सक्षम व्हा
By admin | Updated: November 28, 2014 23:44 IST