कोल्हापूर : कदमवाडी येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूूट आॅफ मॅनेजमेंटच्या युवक-युवतींनी प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या कलाकारांशी मुक्त संवाद साधला. या तिघांची प्रमुख भूमिका असलेला ‘बाजी’ हा अॅक्शन चित्रपट सहा फेब्रुवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आज, गुरुवारी शहरात आलेल्या या सुपरस्टार्सनी ‘बाजी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अॅक्शन चित्रपट ठरणार असल्याचा दावा केला. ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅॅफ मॅनेजमेंट यांच्यातर्फे हा कार्यक्रम कदमवाडी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन आहेत. यावेळी चित्रपटाची कथा, प्रमुख भूमिका याविषयी प्रश्न विचारण्यासाठी कॉलेजीयन्सनी श्रेयस, अमृता आणि जितेंद्र या त्रयीला अक्षरश: गराडा घातला. श्रेयस तळपदे ‘बाजी’ मध्ये नायकाची भूमिका करीत असून, अमृता खानविलकर नायिकेच्या भूमिकेत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘दुनियादारी’त खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या जितेंद्र जोशीने ‘मार्तंड’ या पात्राची भूमिका साकारली आहे. अमृता खानविलकर साध्या स्त्रीच्या भूमिकेत आहे.श्रेयस आणि ‘नटरंग’फेम अमृता खानविलकरची भूमिका यामुळे ‘बाजी’ युवावर्गाची गर्दी खेचणार, असा विश्वास जितेंद्र जोशीने व्यक्त केला़ यावेळी भारती विद्यापीठ-इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. नितीन नायक, प्रा. डॉ. बी. आर. पाटील, आदी उपस्थित होते. सोनाली सदरे हिने सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
‘युवा नेक्स्ट’ सदस्यांनी साधला ‘बाजी’ कलाकारांशी संवाद
By admin | Updated: January 23, 2015 00:39 IST