कोल्हापूर : सत्ता जर केंद्रीत झाली तर ती भ्रष्ट होते, त्यामुळे ती अधिक लोकांच्या हाती गेली पाहिजे, अशी यशवंतराव चव्हाण यांची भूमिका होती. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांनी नवनेतृत्वाची फळी उभारली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी येथे काढले.
जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर पोलीस मैदानात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी दिव्यांगाना अनुदानाचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० लाखांंच्या अर्थसहाय्याचा धनादेश देण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या निधीतून ३९ रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी नसताना चव्हाण यांनी अतिशय कष्टातून नेतृत्व घडवले आणि राज्य, देशपातळीवर अमीट असा ठसा उमटवला. जिल्हा परिषदेत येणाऱ्या सदस्य, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य दिशेने जाण्यासाठी हा पुतळा प्रेरणा देत राहील. औद्याेगिक वसाहती, वित्तीय महामंडळ यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा चेहरा बदलला. मी भाग्यवान आहे की, त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून मान दिला. ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात बाळासाहेब माने, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर यांच्या नेतृत्वाची फळी निर्माण झाली, अशीच फळी चव्हाण यांनी महाराष्ट्रात उभी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संसदेतील पुतळ्यापेक्षा कोल्हापुरातील चव्हाण यांचा पुतळा अतिशय हुबेहूब आहे. हा पुतळा उभारल्याबद्दल कोल्हापूरकरांचे मी आभार मानतो. सध्याचे राज्यातील सरकार स्थापन करताना काॅंग्रेस श्रेष्ठींचा विरोध होता. आमदारांना मंत्री व्हायचे म्हणून गडबड सुरू आहे, असे त्यांना वाटत होते. परंतु, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार संपू नये यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि त्यामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आर. आर. पाटील व जयंत पाटील यांनी ग्रामविकासामध्ये चांगले काम केले, तसेच काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना देण्याचा निर्णय घेतला. शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आजी, माजी सैनिकांना घरफाळा माफ करण्यात येणार आहे. केवळ शरद पवार यांच्यामुळे मला हे ग्रामविकासाचे काम करण्याची संधी मिळाली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा वैचारिक पाया मजबूत केला आणि नंतरच्या काळातही त्यांच्या विचारांवर महाराष्ट्र उभा करण्याचे काम शरद पवार यांनी केले. चव्हाण यांच्या सुत्रामुळेच आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रशासनाची घडी कधी विस्कटली नाही.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारावरील हा पुतळा प्रेरणा देत राहील, असा एकही आठवडा गेला नाही की, ग्रामविकास विभागाने एखादा निर्णय घेतला नाही. सरपंच आरक्षण पुढे ढकलून मुश्रीफ यांनी चांगला पायंडा पाडला, त्यामुळे संघर्ष कमी होण्यास मदत झाली. अध्यक्ष बजरंग पाटील यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले.
यावेळी आमदार अरूण लाड, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, भरमूआण्णा पाटील, के. पी. पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे उपस्थित होेते. मावळते आणि नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, संजयसिंह चव्हाण यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
चौकट
सतेज पाटील यांना दिवस चांगले
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात हसन मुश्रीफ यांची प्रशंसा केली. सरपंचपदाचे आरक्षण नंतर जाहीर करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे गावागावात होणाऱ्या निवडणुकीत कुणी गब्बर पुढे आला नाही. हाच धागा पकडून गृहराज्यमंत्री असलेल्या सतेज पाटील यांना त्रास होऊ नये, अशी भूमिका ज्याअर्थी हसन मुश्रीफ घेत आहेत, त्याअर्थी सतेज पाटील यांना दिवस चांगले आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
चौकट
मुश्रीफ यांना पवार यांचे प्रमाणपत्र
हसन मुश्रीफ हे सक्रिय मंत्री आहेत. कोरोना काळात त्यांनी चांगले निर्णय घेतले, अशा शब्दात शरद पवार यांनी मुश्रीफ यांचा यावेळी गौरव केला. तसेच उपस्थित सर्वच वक्त्यांनी मुश्रीफ यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून घेतलेल्या अनेक निर्णयांचा यावेळी उल्लेख केला.
चौकट
दिनकरराव यादव यांच्या आठवणी
पवार यांनी जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दिनकरराव यादव यांच्या अनेक आठवणी जागवल्या. यशवंतराव चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत प्रश्न उपस्थित करणारे, ५४/२ कलमानुसार गावाला नदी देतो म्हणणारे, माकड वसाहतीत कार्यक्रमासाठी घेऊन गेलेले अशा अनेक आठवणी सांगितल्या.
डोंगळें यांची दखल...
व्यासपीठावरून त्यांनी अरूण डोंगळे यांच्याकडे पाहात दूध संघाची मंडळी येथे आहेत, शेजारी अरूण इंगवले आहेत, त्यांच्याशेजारी आजऱ्याचे जयवंत शिंपी आहेत. काल भेटले मला ते, असे सांगत आपल्या स्मरणशक्तीचा दाखला दिला.