इस्लामपूर : येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या हॉकी संघाने शिवाजी विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इस्लामपूरच्याच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा पेनल्टी स्ट्रोकवर पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. कोल्हापूर येथे झालेल्या या आंतरविभागीय स्पर्धेत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील १२ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या संघाची निवड करण्यात आली. केबीपी महाविद्यालयाशी चुरशीने झालेल्या अंतिम लढतीत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या खेळाडूंनी वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन घडवले. निर्धारित वेळेत हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी स्ट्रोकवर खेळविण्यात आला. त्यामध्ये विद्यासागर पाटील याने विजयी स्ट्रोक टाकत अजिंक्यपद मिळवून दिले.या विजेत्या संघात महेश खांबे, रोहन कळकुटगी, विद्यासागर पाटील, वैभव खांबे, अक्षय चौगुले, अमर धोत्रे, सुखदेव वडार, संतोष कलगुटगी, अल्लाउद्दीन शेख, पंकज पाटील, महेश घाडगे, निखील कांबळे, सागर पाटील, समर्थ कदम, सूरज श्रीराम, अभिजित दळवी यांचा समावेश होता. या खेळाडूंना खासदार एस. डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे प्रशिक्षक, राष्ट्रीय हॉकीपटू संजयकाका पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. हेमंत नारायणकर, संजय चव्हाण, संजय कबुरे, संजय चरापले, राजेंद्र खंकाळे यांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. काळे, सचिव अॅड. बी. एस. पाटील, सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अजिंक्य
By admin | Updated: January 2, 2015 00:16 IST