लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने तरुण वीटभट्टी कामगार गंभीर जखमी झाला. संजय शंकर राठोड (वय २२, रा. कणेरी, ता. करवीर. मूळ गाव- वसमभागेवडी, जि. विजापूर) असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास लघुशंकेसाठी तो उठला असता अंदाज न आल्याने पहिल्या मजल्यावरील स्लॅबवरून तो १५ फूट जमिनीवर कोसळला. मध्यरात्रीच त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
भाजलेल्या महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : घरात स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका उडून भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा बुधवारी सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. मंगल तानाजी काटकर (वय ३७, रा. रांगोळी, ता. हातकणंगले) असे महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि. १७) स्टोव्हचा भडका उडून भाजल्याची घटना घडली होती.
दोघे दुचाकीस्वार जखमी
कोल्हापूर : कागल येथील शिवाजी चौकाच्या पुढे बसस्टँड येथे दोन दुचाकींची धडक झाल्याने एका दुचाकीवरील दोघे जखमी झाले. नितीन राजाराम घाडगे (वय २४), सचिन टोप्पान्ना कानडे (२२, दोघेही रा. वाघे, कोगनोळी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. जखमींना उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.
माळ्यावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर : घरात साफसफाई करताना माळ्यावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. तानाजी श्रीपती पाटील (वय ६०, रा. येळवडे, ता. राधानगरी) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल झाले असता त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.