निपाणी येथे कार्यकर्ता मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : सध्या होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक ही काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असून, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागण्याची गरज आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संघटित राहून सिद्धरामय्या सरकारने मागच्या काळात केलेली सर्व कामे घरोघरी पोहोचविण्याची ही वेळ आहे. सध्या भाजपची अवस्था दयनीय झाली असून, अनेक लोकांना सोयी-सुविधा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, असे मत काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा मंडळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी राजेश कदम यांनी स्वागत केले.
जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले की, पक्षातील कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर हेवेदावे विसरून आता कामाला लागले पाहिजे.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले की, देशात भाजप सरकार आल्यानंतर हुकूमशाही वाढली आहे. निपाणी भाजपचे मंत्री, खासदार हे विरोधी पक्ष व पत्रकारांच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेत आहेत. पैशाच्या जोरावर राजकारण चालू आहे. अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची ही संधी आहे.
यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, नगरसेवक विलास गाडीवडर, राजेंद्र वडर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, पंकज पाटील, महावीर मोहिते, संजय सांगावकर, प्रदीप जाधव यांच्यासह मान्यवर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकारांवरील अन्यायाचा निषेध*
संपूर्ण मेळाव्यामध्ये मनोगत व्यक्त करणाऱ्या प्रत्येक नेत्याने निपाणीमध्ये नगरपालिकेत पत्रकारांवर झालेल्या अन्यायाचा निषेध केला. यापुढे पत्रकार जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव राहील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
फोटो : निपाणी : मराठा मंडळ भवनात आयोजित मेळाव्यात सतीश जारकोहोळी यांनी मार्गदर्शन केले.