: गवसेपैकी आल्याचीवाडी (ता. आजरा) येथील लता महादेव परीट (वय ४२) या महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करीत अज्ञाताने खून केला आहे. ही घटना पाग्याच्या नावाच्या शेतात दुपारी १२ वा. सुमारास घडली. खुनाच्या घटनेमुळे आल्याचीवाडी व गवसे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लता परीट या सकाळी आपल्या दोन मुलांसह जनावरांसाठी गवत आणण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. गणपती सणामुळे उद्या गवत आणता येणार नाही म्हणून त्यांनी आज जादा गवत कापले. सुरुवातीला दोन्ही मुले गवत घेऊन घरी आली व नंतर लता गवत घेऊन येणार होत्या. मात्र दुपारी दोनपर्यंत आई घरी आली नाही म्हणून ग्रामस्थांसह मुलांची शोधाशोध सुरू झाली. पाच वाजण्याच्या सुमारास जनार्दन देसाई यांच्या उसाच्या शेतात लता यांचा मृतदेह असल्याचे लक्षात आले. अज्ञाताने लता परीट यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून मृतदेह उसाच्या शेतात टाकला होता. मृतदेह ओळखू नये म्हणून तिच्या तोंडावर गवत व उसाचा पाला टाकला होता. सायंकाळी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, पो. हे. काॅ. दत्ता शिंदे यांनी भेट दिली. आज सकाळपासूनच या परिसरात प्रचंड पाऊस पडत असल्याने घटनास्थळी जाण्यात अडचणी येत होत्या. आजरा पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून, तपासासाठी दोन पथके विविध ठिकाणी पाठविली आहेत.
फोटो - ०९लता परीट.