कोल्हापूर : जिल्ह्यात आज दुसऱ्यांदा वळीव पावसाने अनेकांची दैना उडवली. दिवसभराच्या वाढलेल्या उष्म्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. आजरा, हातकणंगले आदी तालुक्यांत गारांचा वर्षाव झाल्याने कोल्हापूर ते सांगली मार्ग काही काळ बंद राहिला. याशिवाय अनेक मार्गावर झाडे पडल्याने कोल्हापूर ते रत्नागिरी, वडगाव ते हातकणंगले या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.शिरोली परिसरात घरांचे छप्पर उडून गेल्याच्याही घटना घडल्या. तसेच अनेक ठिकाणी झाडे विजेच्या तारांवर पडल्याने अनेक विजेचे खांब उन्मळून पडले, त्यामुळे सायंकाळनंतर वीज गेल्याने अनेक गावे अंधारात राहिली. इचलकरंजीत वळीवइचलकरंजी : गेल्या तीन-चार आठवड्यांच्या असह्य उकाड्यानंतर गुरुवारी सायंकाळी वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. वळवाने आठवडाभर हुलकावणी दिली असली तरी सुमारे तासभर पडलेल्या पावसाने हवेत सुखद गारवा पसरला होता.दिवसभर आकाशात ढग असले तरी हवेतील उकाड्यामध्ये तीव्रता होती. दुपारी तीन वाजता आकाशात ढग जमून अंधारून आले असले तरी वारा सुटल्यामुळे पावसाने हुलकावणी दिली. मात्र, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पादचारी, दुचाकीधारक व विक्रेत्यांची धावपळ उडाली.कोल्हापूर-सांगली वाहतूक ठप्पहातकणंगले : तारदाळ, मजले, हातकणंगले, अतिग्रे, रुकडी, चोकाक अशा व्यापक परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी वळवाचा पाऊस झाला. रुकडी, अतिग्रे परिसरामध्ये गारा पडल्यामुळे कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. गेल्या महिनाभराच्या उकाड्यानंतर पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा सुटला होता. शिरोली एमआयडीसीतील वीज खंडितशिरोली : वादळी वाऱ्यामुळे कासारवाडीत पत्रे उडून गेले, तर शिरोली एमआयडीसीमध्ये झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा काहीवेळ खंडित झाला होता.गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे कासारवाडीमधील प्रकाश खोत, प्रल्हाद शिंदे, बाळासाहेब खाडे, आनंदा पोवार यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे उडून गेले, तर शिरोली एमआयडीसीमधील प्रगती टाईल्ससमोरील नारळाचे झाड उन्मळून पडले. तसेच देवजी व आर. एन. डी. कंपनीसमोरील झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता, पण रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू झाला. शिरोली, नागाव, टोप, कासारवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला.वाघबीळ घाटात झाड पडलेपोर्ले तर्फ ठाणे : वळीव पाऊस व वादळी वाऱ्याने पडवळवाडी फाटा आणि वाघबीळ घाटादरम्यान स्वामी समर्थ मंदिराजवळ दोन झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर वाहतूक तब्बल दीड तास ठप्प होती. या झाडाखाली दोन दुचाकी सापडल्याने नुकसान झाले. या रस्त्यावरील वाहतूक सुमारे ठप्प झाली होती. पडवळवाडी ग्रामस्थांच्या मदतीने ही झाडे बाजूला करून वाहतुकीस रस्ता खुला करण्यात आला. जयसिंगपुरात हलक्या सरीजयसिंगपूर : जयसिंगपूरसह दानोळी, कोथळी, कवठेसार, आदी परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी विजांचा लखलखाट सुरू होता. सव्वा सहानंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर प्रंचड उष्मा जाणवत होता. मात्र, सायंकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता.वडगावमध्ये झाड पडून तीन वाहनांचे नुकसानपेठवडगाव : पेठवडगाव येथे गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. नगरपालिकेतील सरसेनापतीधनाजी जाधव खुले नाट्यगृहामध्ये असणारे अनेक वर्षांचे चिंचेचे झाड कोसळले. झाडाखाली सापडून कार व दोन मोटारसायकलींचे नुकसान झाले. पोलीस स्टेशन परिसरातील झाड स्वागत कमानीवर कोसळले, तर रस्त्यावर विजेचे खांब कोसळल्याने वडगाव ते हातकणंगले रस्त्यावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. अनेक ठिकाणी झाडे पडल्याची व घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. भादवण, सुळे येथे तडाखा : प्रचंड नुकसानआजरा : आजरा शहरासह सरंबळवाडी, सुळे, भादवण परिसरात झालेल्या वादळी पावसाने सरंबळवाडी येथील घराचे छप्पर उडाल्याने, तर भादवण परिसरात झाडे पडल्याने प्रचंड नुकसान झाले. गुरुवारी दुपारी आजरा शहरात अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली, तर सरंबळवाडी, भादवण येथे जोरदार वाऱ्यासह आलेल्या वादळी पावसामुळे सरंबळवाडी येथील सहदेव माणगावकर, तुकाराम मुळे यांच्या घरांचे छप्पर उडून सुमारे शंभर फुटांवर एका स्विफ्ट कारवर पडल्याने कारचे नुकसान झाले. सुळे येथे जोरदार गारांसह पाऊस पडला. यामुळे आंबा व काजू पिकांचे नुकसान झाले आहे. सरंबळवाडी येथे कालच यात्रा झाली होती. यात्रेनिमित्त उभारण्यात आलेले मंडप ठिकठिकाणी कोसळले, तर पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता.
विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने तारांबळ
By admin | Updated: May 8, 2015 00:47 IST