अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथे पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुन्हा मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. ते यंदा तरी तंतोतंत होणार का, की सन २०१९ च्या पुराप्रमाणे पंचनामे मॅनेज होणार, असा सवाल संतप्त पूरग्रस्त ग्रामस्थांतून विचारला जात आहे. यंदा बनावट पंचनामे केल्यास दोन्हीवेळचा एकत्र उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चंदूर येथे २०१९ मध्ये आलेल्या महापुरात ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे पडली. त्याचे पंचनामे करण्यात आले. परंतु, ८५ टक्के पडझडीची नोंद झालेल्या घरांनाही सहा हजार रुपयांची मदत मिळाली होती. याउलट ज्यांच्या घरापर्यंत पुराचे पाणी पोहोचलेच नाही. तसेच घराची एक वीटही पडली नाही, अशा ‘काहींना’ ९५ हजार रुपये मिळाले. त्याचबरोबर काही राजकीय मंडळींनी कार्यकर्त्यांसोबत स्वत:च्याही नावावर बोगस पंचनामे दाखवून शासनाचे अनुदान उचलले.
याबाबतची चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी पूरग्रस्त व पडझडीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीरपणे प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली. परंतु, ‘मॅनेज’ टीमच्या प्रभावामुळे ती यादी प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे गावातील काही ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकाराखाली यादी मागितली असता वरिष्ठांनीही पाठराखण करीत यादी देण्यास नकार दिला. अखेर वारंवारच्या पाठपुराव्यानंतर काहींच्या हाताला यादी लागली. त्यामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यामुळे यंदा तरी योग्य पंचनामे व्हावेत, अशी मागणी होत आहे. यामध्ये तडजोड झाल्यास ग्रामस्थांतून उद्रेक होण्याची शक्यता आहे.
चौकटी -
आपत्तीत संधी शोधणारे महाभाग
सन २०१९ साली अचानकपणे आलेल्या महापुरामुळे सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली होती. बाहेरहून येणारी मदत, त्यातील साहित्याचे परस्पर वाटप, पडझडीचे पंचनामे ‘मॅनेज’ करण्याचा प्रकार, पुरातून वाहून जाणाऱ्या वस्तू गोळा करून विक्री, अशा विविध प्रकारांतून काही महाभाग आपत्तीतही संधी शोधतात, अशी चर्चा या महापुरामुळे पुन्हा चर्चेत आली.
सन २०१९ सालची यादी प्रसिद्ध करावी
सन २०१९ साली आलेल्या महापुरात घरांची पडझड झालेल्यांची नावे, तसेच त्यातील मदत मिळालेल्यांची नावे ग्रामपंचायत, गावचावडी अशा सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करावी, अशी मागणी होत आहे.