कोल्हापूर : मी पुन्हा दोन दिवसांनी कोल्हापूरला येईन असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केल्याने ते खरोखरच येणार का आणि त्यावेळी प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सोमय्या यांनी गडहिंग्लजचा आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना चालवायला घेणाऱ्या ब्रिक्सच्या माध्यमातून पुन्हा नवा दुसरा आरोप केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण आणखी तापले आहे.
सोमय्या यांना सोमवारी पहाटे पोलिसांनी कराड येथे उतरवले. त्याचवेळी त्यांनी मी दोन दिवसांनी कोल्हापूरला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आधीच कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण तापलेले असताना पुन्हा सोमय्या जर येणार असतील तर प्रशासनाची कसोटी लागणार आहे. मुश्रीफ यांच्यावरील हे आरोप त्यांच्या मतदारसंघाशी संबंधित असल्याने आजरा, गडहिंग्लज, चंदगड, कागल तालुक्यात या आरोपांची जोरदार चर्चा आहे.
चौकट
घाेरपडे पाठोपाठ नलवडे कारखानाही चर्चेत
मुश्रीफ यांनी उभारलेला सरसेनापती संताजी घोरपडे हा खासगी साखर कारखाना पहिल्या आरोपामुळे चर्चेत आला. आता ज्या पुण्यातील ब्रिक्स कंपनीने गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना चालवायला घेतला त्या कंपनीवरही आरोप झाल्यामुळे हा कारखानादेखील चर्चेत आला आहे.