चंदगड : वैयक्तिक स्वार्थासाठी जगणे सोडून सर्वांनी समाजासाठी योगदान दिल्यास समाजातील सारेच घटक गुण्या-गोविंदाने नांदतील. त्यामुळे दुर्जनांचा नाश करण्यासाठी सज्जनांचा दबाव वाढला तरच गुंडगिरीला आळा बसेल, दुसऱ्याचे घर जळत असताना मजा बघण्याच्या प्रवृत्तीमुळेच समाजाचे नुकसान होत आहे. काही समाजकंठकांकडून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापुढे तो खपवून घेतला जाणार नसल्याचा निर्धार सर्वांनी करा, असे आवाहन चंदगडचे पोलीस निरीक्षक अंगद जाधवर यांनी केले.चंदगड येथील कै. एस. एन. पाटील सभागृहात आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. शाहू काजू कारखान्याचे अध्यक्ष मोहन परब यांनी स्वागत केले. जाधवर म्हणाले, अन्यायाविरोधात संघटितपणे लढा दिला तरच प्रशासनावर दबाव येतो. अन्याय करणाऱ्यावर प्रशासनाला कारवाई करणे भाग पडते. आमच्या निष्क्रियतेमुळेच २०-२५ लोकांनी तालुक्याला लुटले. प्रत्येकाजवळ एक आत्मशक्ती आहे, त्या जोरावरच स्वाभिमानाची ठिणगी पेटावी, अन्यायाविरोधात पेटून उठा.तालुक्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जाधवर यांनी तालुक्यातील व्यापारी, सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, आदींची बैठक बोलविली होती. भर पावसातही या बैठकीला लोकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी अन्याय झालेल्या अर्जुन पटेल, रेखा पुजारी, विष्णू पाटील, विद्या तावडे यांच्यासह माजी सरपंच अरुण पिळणकर, विजयकुमार दळवी, बाळासाहेब पाटील, राजू व्हटकर, प्रा. एन. एस. पाटील, प्रल्हाद जोशी, आदींनी मनोगत व्यक्त केले.चर्चेत अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, प्रताप सूर्यवंशी, नामदेव सुतार, संजय काणेकर, स्वाभिमानीचे नितीन पाटील, संभाजी कुरणे, आदींनी भाग घेतला.यावेळी सभापती ज्योती पाटील, सरपंच सुजाता सातवणेकर, उपसरपंच सचिन बल्लाळ, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, खेडूतचे सचिव प्रा. आर. पी. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शांतता बिघडवणाऱ्या घटना खपवून घेणार नाही
By admin | Updated: July 31, 2014 00:51 IST