कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील टोलसंदर्भात दिलेला निर्णय काहीही असला तरी, लोकशाहीत मिळालेल्या अधिकारांचा वापर करीत रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार येथील सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केला आहे. टोलविरोधात यापुढे आंदोलन कशा पद्धतीचे असावे, याची व्यूहरचना आखण्यासाठी उद्या, रविवारी दुपारी चार वाजता कृती समितीची बैठक होणार असून, त्यात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, आमचे सरकार सत्तेत आल्यास शहर टोलमुक्त करू, अशी ग्वाही कोल्हापूरकरांना देणारे भाजप-शिवसेना पक्ष राज्यात सत्तेत आल्यामुळे त्यांच्यावरील दायित्व वाढले आहे. न्यायालयात निर्णय काहीही झाला असला, तरी टोलविरोधात रस्त्यावरील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने केला असल्याने नजीकच्या काळात कोल्हापुरात पुन्हा एकदा टोल विरोधातील आंदोलन पेटणार आहे. भविष्यातील आंदोलन कशा प्रकारचे असावे, याचा विचारविनिमय करण्यासाठी उद्या, रविवारी येथील विठ्ठलमंदिरात कृती समितीची बैठक होत आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे मार्गदर्शन करून पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची या बैठकीत उपस्थिती असणार आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांवर टोलच्या होत असलेल्या बळजबरीबद्दल या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. काल, शुक्रवारी सायंकाळी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांच्याशी हुज्जत घालीत टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी काही काळ गोंधळ घातला होता. कृती समितीच्या निमंत्रकावरच जर अशा पद्धतीने अरेरावी होत असेल, तर सर्वसामान्य वाहनधारकांची काय अवस्था होत असेल, असा सवाल यानिमित्ताने पुढे आला आहे. त्याचे पडसादही या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. शब्द पाळण्याचे नैतिक बंधन महायुतीवर राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी ‘टोलमुक्त कोल्हापूर’ असे गाजर भाजप-शिवसेनेने कोल्हापूरकरांना दाखविले होते. आता त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कोल्हापुरातील टोल रद्द करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शिवसेनेचे सहा, तर भाजपचे दोन असे दहांपैकी आठ आमदार निवडून दिले आहेत. त्यामुळे दिलेला शब्द पाळण्याचे नैतिक बंधन महायुतीवर आले आहे. सध्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर यांनी टोलविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनात भाग घेतला होता.(प्रतिनिधी)
रस्त्यावरील आंदोलन सुरूच ठेवणार
By admin | Updated: December 7, 2014 00:56 IST