कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘गोकूळ’ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागाचे चांगले आहे. शासनाच्या सर्व योजना संघामध्ये राबवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
लिंगविनिश्चित वीर्यमात्र (सेक्स सोर्टेड सीमेन) नाममात्र किमतीत दूध उत्पादकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे हस्ते मुंबईत सचिंद्र प्रताप सिंह व अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे यांचा सत्कार करण्यात आला. अनुदानावर वैरण बियाणे पुरवठा, मुरघास निर्मिती, सामूहिक जंत निर्मूलन कार्यक्रमासाठी आर्थिक मदत, लाळ खुरकत लसीकरण, गोचीड निर्मूलन मोहीम, तालुका स्तरावर एक्स-रे मशिन, अत्याधुनिक पशुखाद्य तपासणी प्रयोगशाळा अशा विविध बाबीवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी वैरण विकास उपसंचालक गणेश देशपांडे, अभिषेक डोंगळे, डॉ. प्रकाश साळुंके, मलगोंडा हेगाजे, योगेश खराडे, संग्राम मगदूम आदी उपस्थित होते.
इस्राइल सरकारसोबतचा करार फायदेशीर
‘गोकूळ’ स्वखर्चातून दूध उत्पादकांसाठी विविध योजना राबवल्या जात असल्याबद्दल कौतुक करत अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे म्हणाले,
सध्या महाराष्ट्र शासन व इस्राइल सरकार यांच्यामध्ये पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायातील तंत्रज्ञान हस्तांतरणाचा सामंजस्य करार करण्याबाबत बोलणी सुरू आहेत. यामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता येईल व ते दूध व्यवसायासाठी खूप फायदेशीर असेल.
फोटो ओळी : राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचा मुंबईत ‘गोकूळ’चे संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रकाश साळुंखे, मलगोंडा हेगाजे, योगेश खराडे, अभिषेक डोंगळे उपस्थित होते. (फोटो-१९०६२०२१-कोल-अरुण डोंगळे)