कोल्हापूर : गेल्या महापुरावेळी आम्ही निकष बाजूला ठेवून पूरग्रस्तांना मदत केली. परंतु, आता शासनाने अशी कोणतीही मदत अजून जाहीर केलेली नाही. तुमच्या सर्वांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही सर्वजण पाठपुरावा करत राहू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळपासून पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिखली येथे सरपंच एस. आर. पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, रघू पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागण्या मांडल्या. चंद्रकांत पाटील यांच्या काळात मदत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. यानंतर फडणवीस यांनी आंबेवाडीला भेट दिली. यावेळी ‘तुम्ही दोन वर्षांनी आता आलाय. आता घोषणा करून जाणार आणि पुन्हा दोन वर्षांनी येणार’, असे मंदिराच्या बाहेरून बोलणाऱ्या ग्रामस्थाला यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
यानंतर फडणवीस यांनी कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ आणि शाहुपुरीतील कुंभार गल्ली येथे भेट दिली आणि तेथील नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, समरजित घाटगे, अमल महाडिक, महेश जाधव उपस्थित होते.
चौकट
आंबेवाडी सरपंचांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
आंबेवाडीचे सरपंच सिकंदर मुजावर यांनी भाषणावेळी ‘आम्हाला या पुरामुळे जगणं नको झालंय. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १५ ऑगस्टला आम्ही सामूहिक आत्मदहन करू’, असा इशारा दिला.
चौकट
कोल्हापूरला बास्केट ब्रीजची गरज
फडणवीस यांनी बापट कॅम्प येथे भेट दिल्यानंतर धनंजय महाडिक यांची संकल्पना असलेल्या बास्केट ब्रीजबाबत जागेवर जाऊन माहिती घेतली. यावेळी समीर शेठ यांनी त्यांना प्रकल्पाची माहिती दिली. या पुलामुळे पूरकाळातही कोल्हापूरचा संपर्क कायम राहणार असून, एमएसआरडीसीकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. हा पूल आणि चंद्रकांत पाटील आणि अमल महाडिक यांनी या परिसरातील २२ पुलांबाबत जो नवा प्रस्ताव तयार केला होता तो वास्तवात येणे गरजेचे असल्याचे सांगितले.
३००७२०२१ कोल चिखली फडणवीस भेट
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखली (ता. करवीर) या पूरग्रस्त गावाला शुक्रवारी भेट दिली. ग्रामस्थांच्या मागण्या ऐकल्यानंतर फडणवीस यांनी या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
छाया : आदित्य वेल्हाळ