मुश्रीफ यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड : सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील याच्या निर्घृण खुनामुळे महाराष्ट्र हादरला आहे. संशयित मारुती वैद्य व अजूनही कोणी या गुन्ह्यात सहभागी असतील तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. माणुसकीला काळीमा फासणारी ही गंभीर घटना आहे, असे शोकमग्न उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. मंत्री मुश्रीफ यांनी सोनाळी येथे पाटील कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशामुळे मंत्री हसन मुश्रीफसुद्धा गहिवरले.
सायंकाळी चारच्या सुमारास मंत्री मुश्रीफ यांनी सोनाळी (ता. कागल) येथे पाटील कुटुंबीयांच्या घरी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी क्रूरकर्मा मारुती वैद्य याच्याविषयी तीव्र व संतप्त भावना व्यक्त केल्या. या आरोपीला फाशी झालीच पाहिजे, सात वर्षांच्या बालकाचा अमानुष खून करणाऱ्या त्या क्रूरकर्म्याला ठार मारा, अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे, माजी सरपंच सत्यजित पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रविंसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, माजी सरपंच अशोकराव चौगुले, पंचायत समितीचे माजी सभापती भूषण पाटील आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमले होते.
चौकट
मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर पालकांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. ‘साहेब, त्या नराधमाने आमच्या बाळाला तडफडून, टाचा घासून मारले हो ! त्याला जिवंत जाळा, फाशी द्या’, असा आक्रोशही कुटुंबीयांनी केला. यावेळी मंत्री मुश्रीफ गहिवरले व त्यांना अश्रू अनावर झाले.
२१ सोनाळी मुश्रीफ
फोटो :
सोनाळी (ता. कागल) येथील खून झालेल्या वरद रवींद्र पाटील याच्या घरी भेट देऊन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.