कोल्हापूर : कॉँग्रेसचे आमदार म्हणून कार्यरत असणारे महादेवराव महाडिक सध्या जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या कोणत्या उमेदवारांच्या व्यासपीठावर प्रचारासाठी आहेत? पहिल्यांदा त्यांना व्यासपीठावर आणा, दुसऱ्या क्षणाला मी व्यासपीठावर येतो, अशा शब्दांत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कॉँग्रेसचे ‘कोल्हापूर उत्तर’चे उमेदवार सत्यजित कदम यांना कॉँग्रेस कमिटीत सुनावले. जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी जिल्ह्यातील कॉँग्रेसचे नेते आज, मंगळवारी कॉँग्रेस कमिटीत एकत्र आले होते. यावेळी अध्यक्षांच्या दालनात पक्षनिरीक्षक आमदार रामहरी रूपनवार यांच्या उपस्थितीत पाटील यांनी कदम यांची फिरकी घेतली. प्रचारात सहभागी व्हावे, अशी विनंती सत्यजित कदम यांनी सतेज पाटील यांना केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरच त्यांनी कदम यांना सुनावले. महादेवराव महाडिक कोठे आहेत? ते तुमच्या व्यासपीठावर का येत नाहीत? पहिल्यांदा त्यांना प्रचारासाठी व्यासपीठावर आणा; मगच आपण येऊ, असे सतेज पाटील यांनी सांगितले. पी. एन. पाटील हे तिथे आल्यानंतर पुन्हा चर्चेला सुरुवात झाली; पण तोपर्यंत सतेज पाटील तेथून उठून बाहेर गेले. पी. एन. पाटील यांचे समर्थक रणजित परमार हेही प्रचारात सक्रिय नसल्याचे सत्यजित कदम यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर, त्यांच्या घरात पेशंट आहे. ते दोन दिवसांत कामाला लागतील, असे पाटील यांनी कदम यांना सांगितले. बजरंग देसाई यांनी ऐनवेळी माघार कशी घेतली, याचा शोध पक्षाच्यावतीने सुरू असल्याचे निरीक्षक रूपनवार यांनी सांगितले. कॉँग्रेसचे पाच नगरसेवकच सक्रियकॉँग्रेसचे २६ पैकी केवळ पाचच नगरसेवक आपल्याबरोबर प्रचारात सक्रिय असल्याचे सत्यजित कदम यांनी निदर्शनास आणून दिले. यावर निरीक्षकच अचंबित झाले. पक्षाचे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे निरीक्षक रूपनवार व प्रदेश सरचिटणीस सुरेश कुराडे यांनी सांगितले. ‘पी.एन.’ यांची नगरसेवकांना ताकीदकदम यांच्या तक्रारीबाबत पत्रकारांनी नेत्यांना छेडले असता, येत्या आठ दिवसांत सगळ्यांना सरळ केले जाईल. कोण-कोण काय करतो, याचे रेकॉर्ड करा. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरळ होणार नसतील तर त्यांना पद गमवावे लागेल, अशी ताकीद पी. एन. पाटील यांनी कॉँग्रेसच्या नगरसेवकांना दिली. जिल्हा परिषदेचे सदस्य अमल महाडिक व परशुराम तावरे यांना पक्षातून काढून टाकल्याचेही त्यांनी सांगितले.
महाडिक यांच्याकडून कोणाचा प्रचार ? : पाटील
By admin | Updated: October 7, 2014 23:37 IST