कोरेगाव : ‘मनरेगा’अंतर्गत वैयक्तिक विहीर बांधकामाची पाहणी करून तसा अहवाल देण्यासाठी दोन हजारांची लाच घेणारा कोरेगाव पंचायत समितीतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता श्रीकांत चौगुले मंगळवारी लाचलुचपतच्या जाळ्यात अलगद सापडला. त्याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार श्रीकांत चौगुले (सध्या रा. जिल्हा परिषद र्क्वाटर सदनिका क्रमांक ५, जिल्हा परिषदेच्या पाठीमागे, सातारा. मूळ रा. गगणगिरी हौसिंग सोसायटी, प्लॉट नंबर १७/१, कदमवाडी, भोसलेवाडी, कोल्हापूर) कोरेगाव पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात उपअभियंता आहे. त्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत वैयक्तिक विहीर बांधकामाची पाहणी करून तसा अहवाल देण्यासाठी एकाकडे दोन हजारांची मागणी केली. त्याअनुषंगाने संबंधित तक्रारदारांने रक्कम देण्याचे मान्य केले आणि सर्वप्रथम त्याची माहिती त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १0६४ या टोल फ्री क्रमांकावर दिली आणि नंतर लेखी तक्रार केली. मंगळवारी पैसे देण्याचा निर्णयही झाला.दरम्यान, याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर त्यांनी सापळा लावला. संबंधित तक्रारदार दुपारी पैसे घेऊन कोरेगाव पंचायत समितीत आले आणि ते चौगुले यांच्या हातात ठेवले. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आणि कर्मचाऱ्यांनी श्रीकांत चौगुले यास ताब्यात घेतले.दरम्यान, यानंतर श्रीकांत चौगुले याला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)चौगुलेचा पुण्यात एक फ्लॅटलाचलुचपतच्या जाळ्यात अलगद सापडलेला कोरेगाव पंचायत समितीतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता श्रीकांत चौगुले याचा पुण्यात एक फ्लॅट असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. चौगुले याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या सातारा येथील सदनिकेची तपासणी पोलीस निरीक्षक बी. एस. कुरळे यांनी केली. यावेळी काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान, चौगुले मुळचा कदमवाडी (कोल्हापूर) येथील असून कोल्हापूर एसीबीचे पथक त्याच्या घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले होते. पुणे एसीबीचे पथकाला साताऱ्यातून पत्ता देण्यात आल्यानंतर रात्री उशिरा रवाना झाले होते.
दोन हजारांची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात
By admin | Updated: January 20, 2015 23:41 IST