दत्ता बीडकर- हातकणंगले महिला बचत गटांच्या सदस्यांना पेन्शन योजना सुरू होण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील १0८ गावांमध्ये लोकसाधन महिला कुटुंब केंद्राच्या संयोगीता महिला एजंटनी रक्कम गोळा करून अलंकिता स्वयंसेवा स्वावलंबन संस्थेच्या बँक खात्यावर जमा करूनही दोन वर्षांत विमा पॉलिसी योजनेचे प्राणकार्ड मिळाले नसल्याने फसवणूक झालेल्या महिलांनी तालुका स्तरावरील लोकसाधन महिला कुटुंब केंद्राकडे धाव घेतली असता संयोगीता महिला एजंटांनी नोकरी सोडून स्थलांतर केल्याचे आणि तालुका केंद्राच्या कार्यालयाने गाशा गुुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून ग्रामीण भागातील महिलांची लाखो रुपयांची फसवणूक होऊनही महिला आर्थिक विकास महामंडळ मूग गिळून गप्प आहे.यामुळे अलंकिता संस्था आणि महिला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने बचत गटांतील महिलांना गंडा घातल्याचे स्पष्ट होत आहे.महिला बचत गटांच्या सदस्यांची संख्या ११ पासून पुढे असते. एका बचत गटाला हाताशी धरले की, किमान १० ते २० हजारांचीमिळकत होते. अशा गणिताने लोकसाधन महिला कुटुंब केंद्राच्या चालकांनी ग्रामीण भागातील महिलांना पेन्शनच्या नावाखाली गंडा घातल्याचे स्पष्ट होत आहे. महिला कुटुंब केंद्राच्या संयोगीता महिला एजंट दररोज आपल्या २५ महिला ग्राहकांना फूस लावत होत्या. बचत गटातील महिला आपल्याच बचत गटात दोन टक्क्याने कर्ज काढून या पेन्शन योजनेमध्ये एक हजार भरणा करीत होत्या. यासाठी एजंट महिला आपला व्यवहार धनादेशाने करीत होत्या. धनादेशावर कोणाचेही नाव नसल्यामुळे दिलेला धनादेश कोणाच्या खात्यावर जमा होत होता, याचा थांगपत्ता एजंट महिलांना लागत नव्हता. एजंट महिलांना स्टेट बँक आॅफ इंडियाचा अकाऊंट नंबर दिला जात होता. हा अकाऊंट नंबर अलंकिता संस्थेचा असल्याची खात्रीही अनेक महिलांनी केली असता अलंकिता संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा नसल्याचे निदर्शनास येत आहे.संयोगीता एजंट महिला एक हजाराचा धनादेश स्टेट बँकेच्या ११ अंकी खात्यावर भरणा करीत असूनही, त्याबाबतची जमा रकमेची पोहोच मात्र त्यांना दोन वर्षांत मिळाली नाही. रक्कम गोळा केलेल्या महिलांचा रोजचा तगादा पाठी लागल्यामुळे अनेक महिला एजंटांनी दररोजच्या वादावादी आणि कटकटीमुळे राहते गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. रक्कम जमा करण्यासाठी तालुकास्तरावर लोकसाधन महिला कुटुंब केंद्र स्थापन करण्यात आले होते. या कार्यालयांनीही आपला गाशा गुंडाळला आहे. यामुळे रक्कम भरणा केलेल्या महिलांची स्थिती ‘ना घरका, ना घाटका’ अशी झाली आहे.चौकशी करण्याची मागणीमहिला बचत गटांच्या महिला पेन्शन योजनेबाबत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकारी वर्गाचे आणि अलंकिता स्वावलंबी स्वयंसेवी संस्थेचे लागेबंधे समोर येत आहेत. महामंडळाचे अधिकारी अलंकिता संस्थेकडे रक्कम भरणा केल्याचे सांगत आहेत, तर अलंकिताच्या पुणे शाखेच्या व्यवस्थापिका महिला आर्थिक विकास महामंडळाचा आमच्या संस्थेशी संबंध नसल्याचे, तसेच एक वर्षाची रक्कम भरणा केली असेल आणि दुसऱ्या वर्षाचा हप्ता भरणा केला नसेल, तर पॉलिसी आणि योजना लॅप्स झाल्याचे सांगत असल्यामुळे बचत गटांच्या महिलांची रक्कम गेली कुठे? आणि जमा रक्कम कोणाच्या खात्यावर गेली? असा सवाल फसलेल्या महिला करीत आहेत. या प्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी संबंधित महिला करीत आहेत.माझा सहा महिन्यांचा पगार दिलेला नाही. मी स्वत: भारतीय स्टेट बँकेत ४ एप्रिल २0१४ रोजी खाते नंबर ३२२९६३७८६३४ वरती एक हजार रुपये भरणा केला आहे. त्याची पावती अगर विमा पॉलिसी मिळाली नाही. आम्ही रक्कम गोळा करून दिली. गुंतवणूक केलेल्या महिला पैशासाठी आमच्या मागे लागल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन महिलांना न्याय मिळाला पाहिजे.- वंदना हतेकर, एजंट४ एप्रिल २0१४ रोजी भारतीय स्टेट बँकेच्या खाते नंबर ३२२९६३७८६३४ वर एक हजार रुपये भरणा केला आहे. परंतु, आजअखेर पावती किंवा विमा पॉलिसी मिळाली नाही. - संगीता काशीद (आळते),महिला बचत गटाच्या सदस्या.अलंकिता संस्था अगर महिला आर्थिक विकास महामंडळ आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीबाबत आमच्या कार्यालयास कोणतीही माहिती नाही.- शरदचंद्र माळी, गटविकास अधिकारी, हातकणंगले.
बचत गटांच्या पेन्शनची रक्कम गेली कुठे ?
By admin | Updated: October 1, 2015 00:41 IST