कळंबा : उपनगरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसावा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रभाग ७६ साळोखेनगर मध्ये त्रिमूर्ती कॉलनीत पोलीस चौकी सुरू करण्यात आली. सुरुवातीला काही दिवस आठवड्यातून किमान दोनदा खाकी गणवेशात पोलीस तैनात असायचे, त्यामुळे गुन्हेगारी काही प्रमाणात का होईना जरब बसली होती.
गेली पाच वर्षे मात्र साळोखेनगरातील पोलीस चौकी कुलूपबंद असून निव्वळ चौकीचा फलक दिसून येतो. साळोखेनगर आणि जवळच्या उपनगरांचा भाग जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. गंभीर गुन्हे घडले की, नागरिकांना जुना राजवाडा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्यासाठी किमान सहा किलोमीटर फेरा मारावा लागतो. साळोखेनगरातील पाण्याच्या टाकीखाली तपोवन मैदानावर मद्यपींचा उच्छाद मांडला असून, रात्री परिसर महिला, युवतींसाठी असुरक्षित बनला आहे. परिसरात गस्त घालणारे पोलीस दुरापास्तच झाले असून, खाकी वर्दीतील पोलीस फक्त गाडीला काठी लावून जाताना दिसतात.
कळंबा साई मंदिर परिसर, भाजी मंडई परिसरात राजरोस मावा, गुटका गांजा विक्री सुरू असून, किरकोळ गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. सामान्य नागरिक वाढत्या गुन्हेगारीला वैतागले आहेत. नवीन वाशी नाका चौकात एक देशी दारू दुकान आणि पाच बार यामुळे दारूचा महापूर उसळला आहे. किरकोळ कारणावरून वादावादी नित्याची बनली आहे.
एकंदरीत वाढत्या गुन्हेगारीला पायबंद बसण्यासाठी संबंधित प्रशासनाने आठवड्यात किमान काही काळासाठी तरी पोलीस चौकी सुरू ठेवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
साळोखेनगर पोलीस चौकी
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ प्रभाग ७६ साळोखेनगरमधील अनेक वर्षे बंद असणारी पोलीस चौकी
प्रतिक्रिया
साळोखेनगरातील पोलीस चौकी सुरू करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षकांपर्यंत नागरिकांसह पाठपुरावा करूनही यश आले नाही. वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा सुववस्थेचा बोजवारा उडण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.
- अभय तेंडुलकर, उपाध्यक्ष, कोल्हापूर यूथ फाउंडेशन, साळोखेनगर