अनिल पाटील - मुरगूड - गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्याच्या संवेदनशील गावच्या यादीत नंबर वन असणाऱ्या कागल तालुक्यातील बोरवडे गावातील सुजाण नागरिकांनी गावाच्या भल्यासाठी प्रबोधनाच्या मार्गातून पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही निवडणुकीत कोणाचाही जय-पराजय होवो, या ना त्या कारणाने बोरवडेमध्ये राडा ठरलेलाच असतो. रोजच्याच प्रकाराने गावातील सर्वसामान्य नागरिकांतून याबाबत नापसंती व्यक्त होत आहे. गावची शांती भंग करणाऱ्या घटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कागल विधानसभेचा निकाल परतवणारे गाव म्हणून बोरवडे गावची ओळख सर्वश्रूत आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीमागे एकहाती हत्तीचे बळ देणारे गाव म्हणून बोरवडे गाव राजकारणात महत्त्वाचे ठरलेले; पण मंडलिकांपासून हसन मुश्रीफ बाजूला गेल्यानंतर या गावचे तत्कालीन जुन्या मंडलिक गटाचे शिलेदार गणपतराव फराकटे यांनी बोरवडे गावची ताकद हसन मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे मुश्रीफ यांचा विजय सुकर करण्यामध्ये बोरवडेकरांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच मंडलिक, संजय घाटगे गटाला हे गाव मारक ठरत आहे. काही वर्षांपूर्वी विक्रमसिंह घाटगे गटाला या गावाने मतदानामध्ये त्रास दिला होता. मुश्रीफ यांनीही आपल्याला एकगठ्ठा मतदान मिळते म्हणून कोट्यवधीचा निधी, फराकटे यांच्याकरवी महत्त्वाची पदे या गावाला दिली. मुश्रीफांना अगदी परवा झालेल्या निवडणुकीतही या गावाने १६०० चे मताधिक्य दिले.कितीही चांगली कामे झाली तरी गावात विरोधक असणारच, याला अपवाद बोरवडेही नाही. मंडलिक गटाकडून हमीदवाडा कारखान्याचे संचालक आनंदा फराकटे आणि काही वर्षांपूर्वी मुश्रीफांचे निष्ठावंत असलेले, पण आता मंडलिक गटामध्ये सामील झालेले बालाजी फराकटे यांनी गणपतराव फराकटे यांच्या एकहाती सत्तेला थोपविण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आतापर्यंत अनेकवेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना, विधानसभा असो की लोकसभा, या ना त्या कारणांवरून हे दोन्ही गट एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी समोरासमोर येतात आणि मारामाऱ्या, दगडफेक, दरोडा अशा अनेक गुन्ह्यांखाली सर्वसामान्यांची पोरं अडकविली जातात.या सर्वांचा विचार करता हे सर्व थांबविण्यासाठी आणि गावची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी दोन्ही गटांकडून सामंजस्य ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. धार्मिक कार्यक्रमांत, सार्वत्रिक उपक्रमांत सर्वांनी एकदिलाने पुढे आले पाहिजे. विकासकामांच्या माध्यमातून संघर्षाची धार कमी करण्याची जबाबदारी या गावातील नेत्यांनी घेणे गरजेचे बनले आहे. प्रबोधनाबरोबर कायद्याचा बडगा हवाविधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने संवेदनशील गावा-गावांमध्ये बैठका घेऊन परस्पर विरोधी गटांचे प्रबोधन केले. त्यामुळे मुरगूड पोलीस ठाण्याला चांगले यशही मिळाले. बोरवडेची घटना वगळता परिसरामध्ये अगदी मुरगूडमध्येही कोणतीही अनुचित घटना घडली नाही; पण बोरवडे गावात चक्क सातवेळा शांतता बैठक घेऊनही शेवटी राडा झालाच. त्यामुळे प्रबोधनाबरोबर कायद्याचा बडगा बोरवडेकरांना दाखवायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
बोरवडेकरांचे प्रबोधन होणार तरी कधी ?
By admin | Updated: October 23, 2014 00:02 IST