कोल्हापूर : महानगरपालिका आणि पोलीस पथकांच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे संचारबंदी असताना शहराच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची गर्दी वाढत आहे. सकाळी अकरा वाजेनंतर सर्व दुकाने बंद ठेवली जात असली तरी काही ठिकाणी मागील बाजूने व्यवसाय होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दि. १६ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे, तर दि. १ मे पासून ती पुन्हा पंधरा दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरवासीयांनी घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता चांगले सहकार्य केले; परंतु गेल्या दोन दिवसांपासून संचारबंदी काळातील नियमांचे उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे.
नागरिक रोज खरेदीच्या निमित्ताने सकाळी आठ वाजेपासूनच गर्दी करायला सुरुवात करतात. बाजारपेठा, भाजीमंडई येथे ही गर्दी झालेली दिसून येते. सकाळी अकरा वाजेनंतर शहरातील औषध दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवायचे आहेत; पण बारा, साडेबारा वाजले तरी व्यवहार सुरूच असतात. त्यामुळे नागरिकांची गर्दीही तोपर्यंत कायम असते. शिवाय पहिल्यासारखे वाहनधारकांना अडवून चौकशी केली जात नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहने यांची गर्दीही दुपारपर्यंत असते.
मंगळवारी लक्ष्मीपुरी, शिंगोशी मार्केट, महापालिका परिसर, राजारामपुरी या परिसरात नागरिकांनी खरेदीकरिता गर्दी केली होती. लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे कपडे, साड्या, दागिने खरेदी होत आहे. त्यामुळे काही ठराविक दुकाने मागील बाजूने ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊन पुढील दरवाजे बंद ठेवत आहेत. बंद दरवाजाआडून आतील व्यवसाय सुरूच आहेत.
शहराच्या अनेक भागांत संध्याकाळी तर अनेक नागरिक एकत्र जमून गप्पा मारत बसलेले पाहायला मिळतात. शहराच्या गावठाण भागातील अपवाद सोडला, तर उपनगरातील नागरिकांच्या संचारावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्याचा परिणाम उपनगरातील नागरिक बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर पोलिसांचाही फारसा कडक पहारा दिसत नाही. त्यांची मोटारसायकल गस्तही कमी झाली आहे. त्यामुळेच नागरिकांचा संचार वाढत चालला आहे.
(सूचना - फोटो गर्दी कोळकेर तिकटी, गर्दी लक्ष्मीपुरी या नावाने पाहावेत.)