सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसमधून बाहेर पडून ‘महायुती’मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशीच परिस्थिती राहिली तर दोन्ही काँग्रेससाठी ते धोकादायक ठरणार असल्याचे लक्षात घेऊन नवा पर्याय पुढे आला आहे. दोन्ही पक्षांतून बाहेर पडणारी नेतेमंडळी रोखायची असेल, तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या, अशी एकमुखी मागणी पश्चिम महाराष्ट्रातील पाच काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केल्याची माहिती आ. आनंदराव पाटील यांनी दिली.आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील १७४ मतदारसंघांत इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, या मुलाखतीदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात समाविष्ट असणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मैत्रिपूर्ण लढतींची मागणी केली आहे.वाढती नाराजी आणि इच्छुकांची वाढलेली संख्या, परिणामी सांगली, कोल्हापूर, पुणे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातून दोन्ही काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साताऱ्यातही दोन्ही काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. ‘कोरेगावा’तून विजय कणसे यांनी शड्डू ठोकला आहे. ‘वाई’तून मदन भोसलेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा आहे. महाबळेश्वरच्या डी. एम. बावळेकर यांनी शिवबंधन बांधले. ‘कऱ्हाड दक्षिण’मधून डॉ. अतुल भोसले यांनी भाजपमध्ये जावे म्हणून कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे. अनिल बाबर, अजित घोरपडे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. बाबर यांच्या जाण्यामुळे काँग्रेसचे सहयोगी आ. सदाशिवराव पाटील, तर अजित घोरपडे यांच्या उमेदवारीमुळे मंत्री आर. आर. पाटील यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात संजय मंडलिक, संजय घाटगे यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखविला आहे. परिणामी जिल्ह्यातील अन्य काही नेते ‘महायुती’च्या संपर्कात आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत काँग्रेस, राष्ट्रवादीला जसा धोका निर्माण होऊ शकतो, तसा धोका अन्य जिल्ह्यांत होऊ नये यासाठी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली आहे. यातून जो विजयी होईल तो आपला, असेही सूत्र या मंडळींनी मांडले आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी इच्छुकांच्या आज मुंबईत मुलाखतीसातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती उद्या, मंगळवारी दुपारी एक वाजता मुंबई येथे राष्ट्रवादी भवनात होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रात हव्यात मैत्रीपूर्ण लढती !
By admin | Updated: August 25, 2014 22:54 IST