कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’मधून कोल्हापूरला जाणून-बुजून राज्य सरकारने वगळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करत असून ते पुरते विदर्भवादी असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली. आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’बाबत कोल्हापूर शहराचा प्रस्ताव सरकारकडे होता. स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूरचा समावेश झाला असता तर विकासात्मक बदल झाला असता पण दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक कोल्हापूर शहराला ‘स्मार्ट सिटी’मधून वगळले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासावर परिणाम होणार आहे. भाजप सरकार प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असून विकासामध्ये असा भेदभाव करणे उचित नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकार सत्तेवर आल्यापासून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. जिथे संधी मिळेल त्याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेची अडवणूक करण्याचे काम फडणवीस करत आहेत. हे योग्य नसून ते पुरते विदर्भवादी असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली. (प्रतिनिधी)‘मनपा’त राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीमहापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडी झालेली आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी-जनसुराज्य अशी चौरंगी लढत होणार असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून पश्चिम महाराष्ट्र टार्गेट : मुुश्रीफ
By admin | Updated: August 1, 2015 01:02 IST