कोल्हापुरातील बापट कॅम्पमध्ये सर्वाधिक गणेशमूर्ती बनतात. येथे कुंभार बांधवांचे मूर्ती कारखानेच आहेत. येथून मूर्ती परराज्यात जातात. केवळ या एका भागात दोन लाखांवर गणेशमूर्ती तयार होतात. यासह शाहुपुरी कुंभार गल्ली, गंगावेश, लक्षतीर्थ वसाहत आणि साने गुरुजी वसाहत येथे काही प्रमाणात मूर्ती बनवल्या जातात. महापुराचा सगळ्यात पहिला फटका शाहुपुरी कुंभार गल्लीला आणि बापट कॅम्पला बसतो. यंदा २०१९ च्या पुराचा अनुभव असल्याने कुंभारांनी पाणी येणार याची कल्पना येताच पटापट मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवल्या; पण किती मूर्ती आणि कुठं म्हणून ठेवायच्या, जागेचा प्रश्न आलाच. नंतर पाणी एवढं वाढलं की, मूर्ती आहे तसेच ठेवून बाहेर पडावे लागले. त्यामुळे एकेका कारखान्यातील १०० ते ३०० पर्यंत गणेशमूर्ती सहा दिवस पाण्यात होत्या. आता त्या एवढ्या खराब झाल्या आहेत की, हात लावताच त्यांची बांधणी पूर्ण सुटत आहे.
---
कोल्हापूरची गरज भागणार
एवढ्या मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे नुकसान झाले असले तरी अजून गणेशोत्सवाला सव्वा महिना आहे. या काळात आम्ही रात्रीचा दिवस करून कोल्हापूरला पुरातील एवढ्या गणेशमूर्ती तयार करू. आता परगावी गणेशमूर्ती पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांना गणेशमूर्ती मिळणार याबाबत निश्चिंत राहावे, असा विश्वासही कुंभारांनी यावेळी व्यक्त केला.
बापट कॅम्पमधील कुटुंब : ५००
शहरातील एकूण कुंभार कुटुंब : १५ हजार
पुरामुळे खराब झालेल्या गणेशमूर्ती : ७ हजार
--
मूर्ती, मोल्ड, प्लॅस्टर सगळंच पाण्यात
एकदा मूर्ती तयार झाल्यावर भिजली की त्याचा पुनर्वापर करता येत नाही. प्लॅस्टर भिजल्याने ते ठिसूळ होतं, आतला गबाळा, प्लॅस्टर सगळं सुटायला लागते. त्यामुळे भिजलेल्या मूर्तींचा ढिगारा प्रत्येक कारखान्याबाहेर जमला आहे. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे मोल्ड, प्लॅस्टरदेखील भिजले आहेत. मोल्ड बनवण्यासाठी कडक ऊन लागतं. या वातावरणात ते बनत नाही, त्यामुळे नव्याने मोल्ड तयार करून गणेशमूर्ती बनवणं अवघड काम आहे.
---
गेली तीन वर्षे असंच चाललंय, रंगकाम सुरू झालेल्या ३००च्यावर मूर्ती भिजल्या. आता हा व्यवसायच नकोसा वाटायला लागलाय. दरवर्षी नुकसान सोसायचं, पैसा कुठून आणायचा, कर्जं कशी फेडायची सगळं अंधारातच आहे.
सुनंदा येळावडेकर
---
माझ्या गोडावूनमध्ये ८ फुटांवर पाणी होतं. वर ठेवलेल्या मूर्तीसुद्धा वाचल्या नाहीत. आमच्या वर्षभराचे उत्पन्न या गणेशमूर्तींमधून मिळतंय, त्यासाठी कर्जं काढावी लागतात. मूर्ती, भांडवल सगळंच पाण्यात. आम्ही कर्ज कसं फेडायचं, घर कसं चालवायचं.
नितीन माजगावकर
---
माझे १०० गणेशमूर्ती भिजले. मोल्ड, साचे भिजले त्यामुळे नवीन मूर्ती बनवायला पण येत नाही. ऐन सीझनमध्ये काम न करता बसावं लागणार आहे. शिवाय, परगावला मूर्ती पाठवता येणार नाही.
जिग्नेश माजगावकर
---
बापट कॅम्प, शाहुपुरीत दरवर्षी पुराचे पाणी येऊन गणेशमूर्तींचे नुकसान होते. त्यामुळे कुंभार समाजाला काम करण्यासाठी जागा मिळावी, या नुकसानीतून सावरण्यासाठी आर्थिक मदत मिळावी आणि प्लॅस्टरवरील बंदीला स्थगिती द्यावी, अशी आमची मागणी आहे.
मारुतराव कातवरे (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समिती)
--
फोटो नं २९०७२०२१-कोल-बापट कॅम्प०१
ओळ : पुराच्या पाण्यामुळे कोल्हापुरातील बापट कॅम्प येथील कुंभार व्यावसायिकांनी बनवलेल्या हजारो गणेशमूर्ती खराब झाल्या आहेत. या मूर्ती आता जवळच्या खणीत विसर्जित केल्या जाणार आहेत. (छाया : नसीर अत्तार)
----
फोटो नं २९०७२०११-कोल- सुनंदा येळावडेकर, नितीन माजगावकर, जिग्नेश माजगावकर नावाने सेव्ह
---