लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून तरुणावर खुरप्याने हल्ला करून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार घडला. सचिन राजेंद्र पोवार (२९ रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे घडली. याप्रकरणी महादेव सखाराम लाड, अशोक महादेव लाड, तानाजी लाड, कुंडलिक लाड (सर्व रा. लाड गल्ली, निगवे दुमाला) या चौघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दोन दुचाकींची चोरी
कोल्हापूर : कसबा बीड (ता. करवीर) व राजारामपुरी चौथी गल्ली या दोन ठिकाणांहून दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. रवींद्र शिवाजी सनदी (३७, रा. १७६४ ई, राजारामपुरी) यांनी आपली दुचाकी राजारामपुरी ४ थ्या गल्लीत उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती बनावट चावीचा वापर करून चोरून नेली. त्या चोरीबाबत त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच कसबा बीड (ता. करवीर) येथील बीडशेड फाट्यानजीक शेताजवळ उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत दुचाकी मालक कृष्णात विश्वनाथ माने (रा. कसबा बीड) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिली आहे.