लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : जिल्ह्यात आता निवडणूक झालेल्या ४३३ व ऑक्टोबर २०२२ मध्ये निवडणूक होणाऱ्यासह १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची बुधवारी (दि. २७) सोडत काढली जाणार आहे. आता झालेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीनंतर आरक्षण काढले माग उर्वरित ग्रामपंचायतींसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात असून यावरून न्यायालयीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे एकत्रित सरपंच आरक्षण काढले जाते. त्यानंतर मुदत संपेल त्याप्रमाणे निवडणुकांची प्रक्रिया राबवली जाते. जिल्ह्यात तीन टप्प्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतात. त्यात २०२० व २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या टप्प्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. प्रभागरचना, प्रभाग आरक्षण काढल्यानंतर सरपंच आरक्षण काढले जाणार होते. मात्र निवडणुकीच्या अगोदर सरपंच आरक्षण काढले तर ज्या प्रभागात आरक्षण संबंधित उमेदवार आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात इर्षा निर्माण होऊन संघर्ष उफाळून येतो. निवडणूक निकोप पार पडावी, यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होत आहे. संबंधित ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी आदी यंत्रणेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मात्र या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणास वेगळा न्याय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यावरून राज्यात वाद तयार होऊ शकतो, शासनाच्या या प्रक्रियेला न्यायालयातही आव्हान दिले जाऊ शकते.