उद्धव गोडसे
कोल्हापूर : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात वास्तव्यास असलेले बहुतांश हिंदू आणि सिंधी नागरिकांना भारताची ओढ आहे. तिथे अल्पसंख्याकांवर वाढलेल्या अत्याचारांमुळे अनेकजण भारतात येण्याची संधीच शोधत असतात. गेल्या ४० वर्षांत भारतात आलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात राहात आहेत. यातील कोणी व्यवसायाच्या निमित्ताने आले, कोणी लग्न होऊन आले, तर कोणी खास राहण्यासाठीच कोल्हापूरची निवड केली. या सर्वांनाच भारतीय नागरिकत्वाची प्रतीक्षा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज हे पाकिस्तानी नागरिक व्यक्त करत आहेत. पाकिस्तानी त्यांच्या देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार करतात. दहशतवाद पोसणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
आम्ही जन्माने पाकिस्तानी असलो तरी आमचे अनेक नातेवाईक, धार्मिक स्थळे भारतात आहेत. भारताची ओढ आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदू आणि सिंधी लोक भारतात येण्यासाठी प्रयत्न करतात.
सावित्रीकुमारी कशेला - गांधीनगर (पाकिस्तानी नागरिक)
तेथून येऊन येथे संसार
सावित्रीकुमारी या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहात होत्या. ३० वर्षांपूर्वी त्या आई-वडिलांसोबत भारतात आल्या. हे कुटुंब नागपूरला स्थायिक झाले. गांधीनगरातील कापड व्यापारी किशनचंद कशेला यांच्याशी २५ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. दीर्घ मुदतीचा व्हिसा मिळाल्याने त्या कोल्हापूरकर बनल्या. ४८ वर्षीय सावित्रीकुमारींचा मोठा मुलगा कंपनीत नोकरी करतो, तर मुलगी शिक्षण घेते.
कमलेशकुमार अशोक अडवाणी (५३) हे त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षी पाकिस्तानातून भारतात आले. सध्या ते वळीवडे येथील कोयना कॉलनीत राहतात.
अनिताकुमारी आणि सुनीताकुमारी चोटवाणी या भगिनी जानेवारी १९९१ मध्ये पाकिस्तानातून भारतात आल्या. दोघी गांधीनगरमध्ये राहतात.
ताराराणी चौक परिसरात राहणारे अशोककुमार सचदेव (७०) हे २००४ मध्ये भारतात आले. वयाची ५० वर्षे पाकिस्तानात घालवल्यानंतर येथे आल्याचे समाधान ते व्यक्त करतात.