राधानगरी : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच जिल्ह्यात पाण्याची मागणीही वाढत आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर आला असून, काटेकोर नियोजन न केल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या धरणात ४.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. हे पाणी पुढील साडेतीन महिने पुरवावे लागणार आहे.जिल्ह्यातील अनेक गावांना या धरणाचा आधार आहे. ८.३२ टीएमसी एवढी क्षमता असल्याने या पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागतो. गैबी बोगद्यातून काळम्मावाडीचे पाणी भोगावती नदीत सोडले जाते. हे धरण यावर्षी भरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांत राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. येथील खासगी जलविद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी त्याचा वापर झाला. तरीही गरजेपेक्षा जादा पाणी सोडल्याचे काहींचे म्हणणे आहे.शनिवारी सकाळी धरणात ४.३१ टीएमसी इतका पाणीसाठा होता. गतवर्षी ४ मार्च अखेरीस ४.०५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत किंचित जादा पाणी आहे, मात्र यंदा उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाल्याने पाणी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)
राधानगरी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर
By admin | Updated: March 4, 2017 23:44 IST