दिंडनेर्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे होत असलेल्या रस्त्याच्या कामात अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमिनीचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दिंडनेर्ली गावच्या पाझर तलावापासून गावातील रेणुका मंदिरापर्यंत शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून १ कोटी २६ लाख रुपये निधीचा २ कि.मी. अंतराचा रस्ता करण्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. सध्या या रस्त्याच्या ठिकाणी खडीकरण झाले असून पावसामुळे काम थांबले आहे पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याच्या बाजूचे गटर करावीत, अशी सूचना केली होती, वारंवार मागणी करूनदेखील सर्वांनाच उडवाउडवीची उत्तरे दिली होती. दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूस गटर नसल्यामुळे सरळ पावसाचे पाणी काशिनाथ पाटील तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने अंदाजे पाच ते सहा एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच एक एकरातील वांगी, मिरची, दोडका याचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी ही याच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे, ठेकेदाराकडे गटर करण्याची विनंती केली होती. पण मागील वर्षीही गटर न केल्यामुळे नुकसान झाले होते, पण रस्ता होऊन शेतकऱ्यांची सोय होणार असल्यामुळे मागील वर्षी कुठलीही तक्रार न करता सर्व शेतकऱ्यांनी नुकसान सोसले होते.
दोन महिन्यांपूर्वी भागातील शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात कार्यकारी अभियंता यांच्याकडे आहेत. लेखी तक्रार केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्या तक्रारीची दखल घेऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटर काढले असते तर आज शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले नसते, असे काशिनाथ पाटील यांनी सांगितले.