कसबा बावडा : उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या प्राणिमात्रांची तहान भागविण्यासाठी ‘केअर’ या सामाजिक संस्थेने शहर परिसरात ‘वॉटर बाउल’ची (जलपात्र) मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत सयाजी हॉटेलसमोर पहिले जलपात्र ठेवण्यात आले असून, त्याचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते बु्धवारी करण्यात आला.
कोल्हापूरमध्ये प्राणिप्रेमी नागरिकांची संख्या मोठी असून, या उपक्रमाला त्यांची नक्कीच साथ मिळेल असा विश्वास यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केला. या संस्थेने तहानलेले कुत्रे, गुरे, पक्षी व अन्य प्राण्यांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ठिकठिकाणी ‘वॉटर बाउल’ ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शहर परिसरात नागरिकांच्या मदतीने किमान १०० ‘वॉटर बाउल’ ठेवण्यात येणार आहेत. ‘केअर’च्या शर्वरी पाटील व डॉ. निहारिका प्रभू यांनी उन्हाळ्यात प्राण्यांची तहान भागवण्याच्या हेतूने ही योजना हाती घेतल्याचे सांगितले. वॉटर बाउल प्रोजेक्टच्या माध्यमातून किमान एक हजार प्राण्याची तहान भागवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ‘केअर’चे आदित्य पाटील, मिलिंद जगदाळे, विक्रांत भोसले, प्रसाद लगड, त्याचबरोबर डी.वाय. पाटील ग्रुपच्या श्रीलेखा साटम, तुषार भोसले, आर्किटेक्ट केतन जावडेकर उपस्थित होते.
फोटो : २५ जलपात्र
ओळी: सयाजी हॉटेलसमोर ‘केअर’ संस्थेच्या ‘वॉटर बाउल’ उपक्रमाचा शुभारंभ करताना आमदार ऋतुराज पाटील. समवेत शर्वरी पाटील, डॉ. निहारिका प्रभू, आदित्य पाटील आदी.