कोल्हापूर : सेंट्रल वॉरियर्सने देवगिरी फायटर्सचा २-१ ने, तर जे. एम. टायगर्सने बावडा बायसनचा १-० असा पराभव करत शहीद पोलीस सहआयुक्त अशोक कामटे यांच्या स्मरणार्थ प्रीमिअर लीग हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी ही अंतिम लढत होणार आहे. लाईन बझार येथे बुधवारी पहिला उपांत्य सामना सेंट्रल वॉरियर्स विरुद्ध देवगिरी फायटर्स यांच्यात झाला. हा सामना सेंट्रल वॉरियर्सने २-१ असा जिंंकत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सामन्याच्या पाचव्या मिनिटास देवगिरीच्या नीलेश घाडगे याने पहिला गोल नोंदवत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात देवगिरी संघास ही आघाडी टिकवता आली नाही. सामन्याच्या २३ व्या मिनिटास ‘सेंट्रल’कडून समीर भोसलेने गोल नोंदवत १-१ अशी बरोबरी साधली. अखेरच्या काही वेळात ‘सेंट्रल’च्या संजय बंडागळे याने गोल नोंदवत २-१ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम राखत ‘सेंट्रल’ने विजय मिळवला. दुसरा उपांत्य सामना बावडा बायसन विरुद्ध जे. एम. टायगर्स यांच्यात झाला. हा सामना जे. एम. टायगर्सने १-० ने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. हा विजयी गोल ३३ व्या मिनिटास जे. एम.च्या योगेश गवळी याने केला.
वॉरियर्स, टायगर्स अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 00:32 IST