देवदास वरेकर / पन्हाळाऐतिहासिक आणि पर्यटन महत्त्व असलेल्या पन्हाळ्याच्या समस्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या आहेत. पन्हाळा गिरीस्थानाचे आणि तालुक्यातील अनेक प्रश्न ‘जैसे थै’ आहेत. पन्हाळा नगरपालिकेचा विकास आराखडा गेल्या तीस वर्षांपासून शासन दरबारी रखडला आहे, तर तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या समस्या आहेत. नव्या नेतृत्त्वाने या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहेत. पन्हाळा तालुका पूर्व आणि पश्चिम असा विभागला आहे. तालुक्यात पूर्व भागात विकसित, तर पश्चिम अविकसित अशी तफावत दिसते. पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेचा विकास आराखडा गेल्या तीस वर्षांपासून रखडला आहे.मार्च २०१३ मध्ये विकास आराखडा मंजूर होणे अपेक्षित असताना अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. वाढते पर्यटक आणि ऐतिहासिक महत्त्व पाहता पन्हाळगडाचा विकास होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात आला; पण त्याचे ना जाहीर प्रकटन झाले, ना नकाशे प्रसिद्ध झाले. तो विकास आराखडा नागरिकांसमोरदेखील आला नाही. आराखड्याची अशी परिस्थिती असताना याउलट विकासाच्या नावाखाली काही नागरिकांच्या घरातून रस्ते काढण्याचे प्रकार झाले आहेत. दीड वर्षापूर्वी आराखड्याबाबत हरकती मागविल्या असून, अद्याप त्यावर सुनावणी झालेली नाही, असे असताना पुन्हा नव्याने शासनाने नकाशाबाबत हरकती मागविल्या आहेत. तालुक्यातून पाच नद्या वाहत असतानादेखील नियोजनाअभावी सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीच्या पाण्यासाठी अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. कोडोली-वारणा परिसर सिंचनाच्या दृष्टीने सुजलाम् सुफलाम् असला, तरी येथे रस्त्यांचा प्रश्न उग्र झाला आहे. येथील बहुतांश रस्ते खराब आणि अर्धवट अवस्थेत आहेत. बांदिवडे, घुंगरू, बेखंडवाडी, बादेवाडी, आदी परिसरातील वाड्या-वस्त्यांवर अजूनही एस.टी.ची सेवा पोहोचलेली नाही. कोलिक, पडसाळी, पिसात्री, काऊरवाडी, किसरूण, माणवाड, पाटपन्हाळा, आदी गावांच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा उपद्रव सहन करावा लागतो.
पन्हाळा तालुक्याला समतोल विकासाची प्रतीक्षा
By admin | Updated: November 14, 2014 00:39 IST