वार्षिक महागाई भत्त्यानुसार पीस रेटवर रूपांतरित दरवाढ
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांना १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या वर्षासाठी ५२ पिकाला ८ पैसे मजुरीवाढ जाहीर करण्यात आली. या वर्षातील महागाई भत्त्याची पीस रेटवरील रूपांतरित रक्कम ०.८३ पैसे एवढी होते. ती पूर्णांकामध्ये ८ पैसे होते, अशी माहिती सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
सन २०१३ मध्ये झालेल्या करारानुसार महागाई भत्त्यातील वाढीनुसार येणारी रक्कम पीस रेटवर रूपांतरित करून ही दरवाढ दरवर्षी सहायक कामगार आयुक्त यांनी जाहीर करण्याचे त्यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी भोईटे यांनी मजुरीवाढ जाहीर केली. याप्रमाणे यंत्रमागधारकांनी कामगारांना मजुरीवाढ द्यावी, असे आवाहनही केले.
सन २०१३ सालापूर्वी यंत्रमाग कामगारांना तीन वर्षांसाठी मजुरीवाढीचा करार केला जात होता. त्यानुसार त्यावेळी प्राप्त परिस्थितीनुसार दरवाढ जाहीर केली जात होती. त्याप्रमाणे यंत्रमागधारक कामगारांना मजुरीवाढ देत होते, तर ट्रेडिंगधारक यंत्रमागधारकांना त्या पटीत मजुरी वाढवून देत होते. मात्र, सन २०१३ मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनामुळे वरीलप्रमाणे नव्याने करार झाला होता.
चौकटी यंत्रमागधारकांचा विरोध
गेल्या काही वर्षांपासून यंत्रमाग व्यवसायाची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. तसेच कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे हा तोडगा रद्दबातल ठरवून नव्याने करार होईपर्यंत मजुरीवाढ देऊ नये, अशी मागणी विविध यंत्रमागधारक संघटनांनी केली होती. तरीही करारात ठरल्याप्रमाणे मजुरीवाढ जाहीर करण्यात आली.
सहा दिवस उशिरा मजुरीवाढीची घोषणा
सन २०१३ मध्ये झालेल्या करारात १ जानेवारीपासून दरवर्षी नव्याने मजुरीवाढ जाहीर करण्याचे ठरले होते. त्यासाठी ३१ डिसेंबरच्या आत त्याची घोषणा होणे आवश्यक होते. परंतु, यावर्षी तब्बल सहा दिवस उशिराने मजुरीवाढ जाहीर करण्यात आली आहे.