कोल्हापूर : राजकीय पक्षांचे शहरावरील वर्चस्व सिद्ध करणाऱ्या आणि अनेक उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी मतदान होत असून, सर्व मतदान यंत्रणा शुक्रवारपासून सक्रिय झाली. शहरवासीयांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेत केले. उद्या, रविवारचे मतदान तसेच सोमवारी (दि. २) होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. आज, शनिवारी कर्मचारी मतदान साहित्य घेऊन त्यांना नेमून देण्यात आलेल्या केंद्रांवर जाऊन सायंकाळपर्यंत तिथे मतदानाची व्यवस्था लावतील. शहरात ८१ प्रभागांसाठी ३७८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई असे पाच कर्मचारी असतील. सर्व केंद्रांवर पाच कर्मचाऱ्यांच्या हिशेबाप्रमाणे १८९० कर्मचारी तसेच २०० राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक प्रभागासाठी दोन मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. जर कोणत्याही केंद्रातील मतदान यंत्रात बिघाड झाला किंवा ते सुरूच झाले नाही, तर काही मिनिटांतच त्या ठिकाणी नवीन मतदान यंत्र बसविण्यात येईल. सर्वच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, पंखे यांसह मंडप, बैठकीसाठी खुर्च्या, टेबल, आदी साहित्य पुरविण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर अपंग व्यक्तींना केंद्रात जाताना त्रास होणार नाही, यासाठी केंद्राबाहेर तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी रॅम्प तयार करण्यात आले आहेत. सर्व मतदारांना ‘बीएलओ’मार्फत मतदान स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. शनिवारीही हे काम सुरू राहील.मतदान साहित्याचे आज वितरण आज, शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर साहित्य पाठविण्यात येणार आहे. कसबा बावडा पॅव्हेलियन, रमणमळा बहुउद्देशीय हॉल, वालावलकर हायस्कूल - मुक्त सैनिक वसाहत, राजारामपुरी जगदाळे हॉल, दुधाळी पॅव्हेलियन, गांधी मैदान पॅव्हेलियन, ध्यानचंद हॉकी स्टेडियम या सात ठिकाणांहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फ त मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण व साहित्य वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर साहित्यासह कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी के.एम.टी.च्या ३५ बसेस तयार ठेवल्या आहेत; तर सायंकाळी मतदान झाल्यावर शासकीय तंत्रनिकेतनच्या हॉलमध्ये मतदान यंत्रे जमा करण्याकरिता ७० बसेस दिल्या जाणार आहेत. बायोमेट्रिक टॅब्लेटचा प्रथमच वापरया निवडणुकीत बायोमेट्रिक टॅब्लेट पीसीद्वारे मतदारांची नोंदणी होणार आहे. कसबा बावडा पूर्व बाजू येथील चार, तर रुईकर कॉलनी येथील चार मतदान केंद्रांवर अशी नोंदणी केली जाईल. हे अॅप्लिकेशन इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि., हैदराबाद या कंपनीने तयार केले आहे.मतदान करणाऱ्याच्या हातांच्या ठशांची यंत्रावर नोंद होणार आहे. त्यामुळे बोगस मतदान रोखले जाईल, असा विश्वास आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे देशात प्रथमच असे यंत्र प्रायोगिक तत्त्वावर वापरले जाणार आहे. हे यंत्र मतदान यंत्राला न जोडता स्वतंत्रपणे नोंदणी घेईल. शहरात नाकाबंदीसह कोम्बिंग आॅपरेशन कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या अखेरच्या दोन रात्रींमध्ये अनेक छुप्या घडामोडी घडू शकतात. त्यामधून एखादा अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून शहरात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पोलिसांनी नाकाबंदीसह ‘कोम्बिंग आॅपरेशन’ केले. यावेळी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी व करवीर पोलिसांनी संवेदनशील प्रभागांमध्ये संचलन करीत मोटारसायकलवरून फेरफटका (रूट मार्च) मारीत भयमुक्त वातावरणात मतदान करा, असा संदेश यावेळी दिला. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील चौका-चौकांत व नाक्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. वाहनांतील गॅसकिटच्या तपासणीसह लायसेन्स, वाहनांची कागदपत्रे,तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जात होती. दृष्टिक्षेपएकूण प्रभागांची संख्या - ८१एकूण उमेदवारांची संख्या - ५०६ मतदारांची संख्या -चार लाख ५३ हजार २१० दोन लाख २९ हजार ५१८ पुरुष दोन लाख २३ हजार ६९२ महिला एकाच ठिकाणी मतमोजणी सोमवारी (दि. २) सकाळी दहा वाजल्यापासून शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत एकाच ठिकाणी सर्व प्रभागांची मतमोजणी सुरू होईल. प्रारंभी पोस्टल मतदान मोजले जाईल आणि नंतर यंत्रांवरील मोजणी होईल. दुपारी दोनपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण होईल. २६७ कर्मचारी मतमोजणीचे काम करतील, असे सांगण्यात आले. १०२ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित : शर्माकोल्हापूर : शहरातील २६ प्रभागांतील १०२ मतदानकेंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, मतदानाची प्रक्रिया सुरू असताना कोणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तर आधी ठोकून काढले जाईल. समोर कोण आहे, याचा मुलाहिजा न ठेवता पोलीस कारवाई करतील, असा खणखणीत इशारा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. कोणीही उमेदवारांना पैसे अथवा भेटवस्तूंचे वाटप करू नये म्हणून मतदानपूर्व दोन रात्री पोलिसांनी खडा पहारा ठेवल्याचे सांगितले. शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री या पोलिसांच्या दृष्टीने विशेष संवेदनशील आहेत. या रात्री विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाकाबंदी सुरू राहणार आहे. शहरात गस्त घालणारी पथके ११ सेक्टरमध्ये तयार केली आहेत. शहरात कोणत्याही भागात अनुचित घटना घडली, तर ही पथके त्या ठिकाणी काही मिनिटांत पोहोचतील, असे शर्मा यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निकषांप्रमाणे शहरातील शाहूपुरीतील कोरगावकर इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्र व राजारामपुरीतील राजाराम हायस्कूल येथील मतदान केंद्र अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याशिवाय २६ प्रभागांतील १०२ मतदान केंद्रे ‘संवेदनशील’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या प्रभागांवर लक्ष ठेवण्यासाठी एक पोलीस निरीक्षक व दहा कर्मचारी नेमले आहेत. शहरात १३६० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज बंदोबस्तावर राहील. त्यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे तब्बल एक हजार कर्मचारी आणि ‘सीआरपीएफ’च्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत.
उद्या मतदान; सोमवारी दुपारी ‘पिक्चर क्लिअर’
By admin | Updated: October 31, 2015 00:02 IST