कोल्हापूर : जाऊ देवाचिया गांवा,घेवू तेथेचि विसावा!देवा सांगो सुखदु:ख ,देव निवारील भूक...!!तुका म्हणे आम्ही बाळे,या देवाची लडिवाळे..!!रिमझिमता पाऊस, स्वच्छ वातावरण, हिरवाईची दुलई आणि आषाढाचा महिना या निसर्गाच्या साथीने विठ्ठल दर्शनाच्या ओढीने वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने चालू लागली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील प्रमुख दिंड्या टाळ-मृदंगांचा गजर करीत १५ तारखेला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला रवाना होत आहेत. फुलेवाडी दत्तमंदिराची दिंडी व बजापराव माने तालीम वेस, मंगळवार पेठेतील स्वरूप संच या दिंड्या आज, बुधवारी रवाना झाल्या. मुखी विठ्ठलाचे नाम, टाळ-मृदंगाचा गजर, गळ्यात तुळशीमाळ, पुरुषमंडळींचा झब्बा, धोतर, महिलांची नऊवारी साडी, डोईवर तुळशी वृंदावन अशी पारंपरिक वेशभूषा करून वारकरी या दिंडीत सहभागी झाले. प्रत्येक दिंडीला पंढरपूरला जाण्यासाठी आठ ते नऊ दिवसांचा कालावधी लागतो. कोल्हापुरातून सात-आठ दिवस आधी दिंड्या निघतात. बावड्यातील तुकाराम मंडप व ज्ञानेश्वर मंडप यांच्याही दिंड्या उद्या, गुरुवारी प्रस्थान करणार आहेत. उत्तरेश्वरची दिंडी आज शहरातील सर्वांत मोठी समजली जाणारी उत्तरेश्वर विठ्ठल मंदिराची दिंडी उद्या, गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रस्थान करणार आहे. ज्ञानदेव श्रीपती पाटील (नाना) हे या दिंडीचे नेतृत्व करतात. त्यांचे वडील श्रीपती पाटील यांनी १९५० साली दिंडीला सुरुवात केली. त्यानंतर पांडुरंग पाटील, सावळाराम भोसले यांनी काही वर्षे दिंडी चालविली. नाना पाटील यांनी १९९१ साली दिंडी चालवायला घेतली. दिंडीचे यंदाचे २६ वे वर्ष आहे. संस्थेची पंढरपूरमध्ये ‘माउली निवास’ ही इमारत आहे.
विठू दर्शनाची आस...
By admin | Updated: July 7, 2016 00:38 IST