आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १६ : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील नऊ कोटी १८ लाख रुपये चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवटसह कॉन्स्टेबल कुलदीप कांबळे यांचा अटकपूर्व जामीन तर्द्थ सत्र न्यायाधीश एस. एम. कोचे यांनी मंगळवारी फेटाळला. शिक्षक कॉलनी चोरीप्रकरणात संगनमताने नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलिसांवर कोडोली पोलिसांत चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’चे विशेष पथक करत आहे. अटकेच्या भीतीने संशयित सहायक फौजदार शरद कुरळपकर, कॉन्स्टेबल शंकर महादेव पाटील, दीपक उत्तमराव पाटील, पोलीस नाईक रवींद्र बाबूराव पाटील या चौघांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल केले होते. सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी चारही अर्ज फेटाळले. त्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पोलीस निरीक्षक घनवटसह कॉन्स्टेबल कांबळे यांनी अर्ज सादर केले होते. त्यावर सोमवार (दि. १५) दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद मांडला. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी पुराव्यांनिशी सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून सत्र न्यायाधीश कोचे यांनी दोन्ही अर्ज फेटाळले. दरम्यान, कटाचा दुसरा सूत्रधार संशयित सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले नाहीत. त्याच्या विरोधात भक्कम पुरावे पोलिसांना प्राप्त झाले आहेत. घनवटसह सहा जणांचे अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्याने स्वत:हून पोलिसांत हजर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या निकालाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील करण्याची तसदी घेतलेली नाही. सर्वजण कुटुंबासह पसार आहेत. आता एकाचवेळी सर्वजण पोलिसांत हजर होण्याची शक्यता आहे.
वारणानगर चोरी प्रकरणी विश्वनाथ घनवट, कुलदीप कांबळे यांचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 6:48 PM