गडहिंग्लज : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आवश्यक माहिती संकलित करण्यासाठी गाववार बैठका घेण्याची ग्वाही प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. हिरण्यकेशी-घटप्रभा पूरग्रस्त संघर्ष समितीचे निवेदन स्वीकारल्यानंतर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी गडहिंग्लज दौऱ्यात दुंडगे येथील पूरग्रस्तांच्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवावा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली. त्यानुसार गाववार बैठका घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चर्चेत श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, विद्याधर गुरबे, रमजान अत्तार, वसंत नाईक यांनी पूरग्रस्तांच्या मागण्या मांडल्या.
----------------
पूरग्रस्तांच्या मागण्या अशा :
- हिरण्यकेशी काठावरील पूरबाधित गावातील सर्व कुटुंबांची संकलन नोंदवही तयार करावी. तिचे गाववार वाचन करून पुनर्वसनाचा आराखडा बनवावा.
- बाधित कुटुंबांच्या घरे व मालमत्तेला नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई द्यावी.
- बेघर पूरबाधित कुटुंबांना कर्नाटकच्या धर्तीवर घरबांधणीसाठी १० लाखांचे अनुदान द्यावे.
- एकाच घरात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांचा स्वतंत्र पंचनामा करून त्या कुटुंबांना पुनर्वसनासह अनुदानाचा लाभ द्यावा.
- पुनर्वसनासाठी गायरान, मुलकीपड व शासकीय जमिनी ताब्यात घ्याव्यात.
- शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास नव्या पूरग्रस्त वसाहतींसाठीची जमिनी नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे ताब्यात घ्यावी.
- घरे जमीनदोस्त झालेल्या व पडझड झालेल्या घरांत राहणे शक्य नसलेल्या कुटुंबांना तातडीने निवारा उपलब्ध करून द्यावा.
फोटो ओळी : गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार दिनेश पारगे यांना कॉ. संपत देसाई व विद्याधर गुरबे यांनी निवेदन दिले. यावेळी अजित बंदी, रमजान अत्तार, वसंत नाईक, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १७०८२०२१-गड-१०