कोल्हापूर : साहित्य विकास मंडळाच्यावतीने आयोजित एकोणिसावे ग्रामीण साहित्य संमेलन बेळगाव जिल्ह्यातील कारदगा येथे रविवारी (दि. ३०) होत असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब नाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, डी. एस. नाडगे महाविद्यालयाच्या प्रांगणात संत साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन राणी चन्नमा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दशरथ आलबाळ यांच्या हस्ते होईल. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद कारदगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष अशोक कुरणे भूषविणार आहेत. यावेळी ग्रामीण लेखकांनी व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन उद्यानपंडित व श्री दत्त साखर कारखाना शिरोळचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉ. सदानंद मोरे यांचे अध्यक्षीय भाषण होईल.उद्घाटनानंतर पुढे पाच सत्रात संमेलनात कार्यक्रम होतील. या संमेलनास खासदार प्रकाश हुक्किरे, आमदार विष्णू सूर्या वाघ, वीरकुमार पाटील, शशिकला जोल्ले, गणेश हुक्किरे, माजी आमदार काकासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी रसिकांनी व वाचकांनी या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सचिव प्रकाश भागाजे, भगवंत कुलकर्णी, संचालक विजयकुमार बुडके, महादेव दिंडे, रंगराव बन्ने, महावीर पाटील, सुचित बुडके आदी उपस्थित होते. संमेलनातील कार्यक्रम असे दुपारी साडेबारा वाजता : ‘आमचे गाव, आमचे मोती’ या सदरात प्रशासकीय सेवेत कार्यरत अभिजित शेवाळे व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते रमेश पेटकर यांचे ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर मनोगत.अडीच वाजता : ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे ‘मिश्किली व कविता’ हा हास्यकवितांवर आधारित कार्यक्रम.चार वाजता : सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले यांचे ‘निराळं जग’ या विषयावर व्याख्यान साडेपाच वाजता : शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांचा आणि ‘आसूही हसले..खुदुखुदु..खदाखदा’ हा विनोदी कार्यक्रम.संध्याकाळी सात वाजता : अंतरंग प्रस्तुत ‘मायबोली’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम
कारदगात ग्रामीण साहित्य संमेलन
By admin | Updated: November 25, 2014 00:38 IST