संदीप बावचे - जयसिंगपूर -कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँक निवडणुकीच्या शिरोळ विकास सेवा संस्था गटातून राष्ट्रवादी गटांतर्गतच सरळ लढत झाली असली, तरी काट्याची टक्कर झाली आहे. दिवंगत माजी आमदार सा. रे. पाटील गटाच्या अलिप्त भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत दिसून आली. शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि विठ्ठलराव नाईक-निंबाळकर या दोघांनीही विजयाचा दावा केला असला, तरी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.केडीसीसीच्या गेल्या निवडणुकीत विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचा विजय झाला होता. त्यांच्या विजयात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा बॅँकेच्या सेवा संस्था गटातून राजेंद्र पाटील-यड्रावकर व विठ्ठलराव नाईक-निंबाळकर हे दोघेच आमने-सामने आल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले.विधानसभा निवडणुकीनंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा बॅँकेच्या उमेदवारीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यादृष्टीने त्यांनी पूर्ण ताकदीने नियोजन केले. शिरोळ तालुका विकास आघाडीने त्यांच्या नियोजनात त्रुटी शोधत अनेक ठरावधारकांना अप्रत्यक्षपणे आपल्या गोटात सामील करण्यासाठी प्रयत्न केले. शिरोळ तालुका विकास आघाडीने आपली पूर्ण ताकद निंबाळकर यांच्या पाठीशी लावली असली, तरी मतांच्या रूपात ते कितपत यशस्वी होणार हे निकालादिवशीच समजणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतर केडीसीसीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले. या निवडणुकीत आमदार उल्हास पाटील यांना मात्र येथे भाजप-शिवसेना पॅनेलच्या विरोधात प्रचार करणे भाग पडले. निवडणुकीत कोणताही धोका पत्कारावा लागू नये, असे धोरण राबवत काही मतदारांना सहलीवर नेण्यात आले. मात्र, मतदानादिवशी एकगठ्ठा मतदान होताना दिसून आले नाही. यामुळे दोन्हीही उमेदवारांना मतदारांचा अंदाज समजून आला नाही, असेच चित्र मतदान केंद्रावर होते. या निवडणुकीला विधानसभेच्या संघर्षाची किनार स्पष्टपणे जाणवली. स्वाभिमानी शेतकरी संघटना व सा. रे. पाटील गटाचा पाठिंबा यड्रावकर गटाला मिळण्याची शक्यता शेवटपर्यंत चर्चेत राहिली. केडीसीसीच्या निवडणुकीत यड्रावकर गट व शिरोळ तालुका विकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागली असून, गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत गुलाल कोणाला लागणार याबाबत उत्सुकता आहे.
‘सारे’ श्रेय विजयश्रीच्या पारड्यात
By admin | Updated: May 6, 2015 00:24 IST