आदित्य वेल्हाळ / कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती अधिविभागामध्ये यावर्षी जगातील सर्वांत मोठे ‘वॉटर लिली’ फुलले आहे. कमळ प्रजातीतील हे सर्वांत मोठे फूल असून, अॅमेझॉन खोऱ्यातील नदीमध्ये ते आढळते. ‘व्हिक्टोरिया अॅमेझोनिका’ या शास्त्रीय नावाने ते ओळखले जाते. कोलकाता येथील संशोधकांनी अॅमेझॉन खोऱ्यातून सर्वप्रथम या फुलाचे बी तेथील बॉटेनिकल गार्डनमध्ये आणले. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. एस. आर. यादव यांनी या फुलाच्या बियाणाची मागणी त्यांच्याकडे केली होती. मात्र, कोलकाता बॉटेनिकल गार्डनने यास नकार दिला. बंगलोर विद्यापीठाकडे याची रोपे असल्याचे समजल्यानंतर डॉ. यादव यांनी तेथील डॉ. संजप्पा यांच्याशी संपर्क साधला. डॉ. संजप्पा यांनी शिवाजी विद्यापीठासाठी या वनस्पतीची पाच रोपे उपलब्ध करून दिली. डॉ. यादव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती विभागाच्या कृत्रिम तलावात ही रोपे लावली. ‘लीड गार्डन वनस्पती संवर्धन’ या कार्यक्रमांतर्गत या वनस्पतीची देखभाल करण्यात आली. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षे या वनस्पतीची निगा राखण्यात आली. कोल्हापूरच्या वातावरणात ही रोपे रुजली आणि ७ डिसेंबरला या वनस्पतीचे पहिले फूल उमलले. दुर्मीळ असलेल्या या कमळाच्या प्रजातीला शास्त्रीय भाषेत व्हिक्टोरिया अॅमेझोनिका’ असे म्हटले जाते. अॅमेझॉन नदी खोऱ्यात सापडणाऱ्या या फुलाला अमेरिकन शास्त्रज्ञांनी राणी व्हिक्टोरियाच्या सन्मानार्थ हे नाव दिले आहे. या वनस्पतीला अतिशय तीक्ष्ण काटे आहेत. तिच्या पानाचा घेर ३ मीटर इतका, तर देठ ७ ते ८ मीटर लांब इतका असतो. हे फूल सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान उमलते. उमलल्यानंतर हे फूल वातावरणात विशिष्ट प्रकारचा गंध पसरवते. दुसऱ्या दिवशी या फुलाच्या पाकळ्या गुलाबी होतात. त्याचे परागीभवन ‘बीटल’ जातीचे कीटक करतात. जॉन लिंडले यांनी १८३७ मध्ये प्रथम या वनस्पतीचे नामकरण केले. शिवाजी विद्यापीठात यातील आणखी एक फूल शनिवारी उमलले आहे. दुसरी दोन फुले दोन-तीन दिवसांत फुलणार आहेत.
शिवाजी विद्यापीठात उमलले ‘व्हिक्टोरिया अॅमेझोनिका’
By admin | Updated: December 20, 2015 01:43 IST