जयसिंगपुर : अपंग असूनही आपणही राजकारणात उतरून समाजाचे प्रतिनिधित्व करू शकतो हे निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील रमेश पांडुरंग धनवडे यांनी दाखवून दिले आहे. दोन्ही पायांनी अपंग असलेले धनवडे हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले असून, त्यांना २७१ मते मिळाली आहेत. अपंग उमेदवार निवडणुकीत विजयी होण्याची तालुक्यातील पहिलीच वेळ असून, अपंगांना प्रेरणादायी असे काम केले आहे. निवडणुकीत उमेदवार निवडताना सूकाणू समिती कायम सक्षम उमेदवारांची निवड करीत असतात. मात्र, दोन्ही पायांनी अपंग असलेल्या रमेश धनवडे यांनीच निवडणुकीत उभे राहून स्वत: प्रचार न करता किंवा न फिरता फक्त कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रचाराची धुरा सांभाळली. काम करण्याची तडफ आणि समाजाबद्दल असलेली तळमळ पाहून त्यांना निमशिरगावच्या जनतेने विजयी केले आहे. प्रभाग क्रमांक चारमधून रमेश विजयी झाले आहेत. घरची जबाबदारी सांभाळत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून त्यांनी युवकांचे आणि समाज बांधवांचे संघटन करण्याचे काम केले आहे. तसेच विविध प्रश्न पंचायतीसमोर मांडून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची तळमळ आहे. (प्रतिनिधी)निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर रमेश धनवडे यांचे औक्षण करताना महिला.
दोन्ही पायांनी अपंग उमेदवाराचा विजय
By admin | Updated: July 30, 2015 00:30 IST