कोल्हापूर : रंग-रेषांच्या माध्यमातून कॅनव्हासवर सुंदर स्त्री चित्रे रेखाटणारे ज्येष्ठ चित्रकार गोविंद यशवंत बेंद्रे (वय ८३) यांचे गुरुवारी निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. गोविंद बेंद्रे हे दोन महिन्यांपासून आजारी होते. अखेर गुरुवारी दुपारी १ वाजता नागाळा पार्क येथील घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी नलिनी, मुलगा यशवंत, सून नीता, चार मुली अलका, नंदा, युती, राणी, नातू ओंकार व नात सोनाली असा परिवार आहे. बेंद्रे हे मूळचे धारवाडचे. बालपणापासून गरिबीत वाढलेले. वयाच्या आठव्या वर्षांपासून सुतारकाम, विणकाम, आईसफ्रूट कांड्या विकणे अशी कामे ते करत. आईच्या निधनानंतर बेंद्रे कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. येथे त्यांचे मोठे बंधू वसंत बेंद्रे हे चित्रपटांची पोस्टर रंगविण्याचे काम करत, ते पाहून त्यांना चित्रकलेचे आकर्षण वाटू लागले. जी. कांबळे हे प्रेरणास्थान होते. चित्रकारितेसोबतच ते शाहू चित्रपटगृहात नोकरी करू लागले. वर्तमानपत्रेही टाकत. हे करताना गोविंद बेंद्रे हे फोटोग्राफीचा व्यवसाय करू लागले. गुजरीतील चित्रकार बाबूराव जाधव यांच्या जागेत स्टुडिओ उभा करून दैनिकांचे छायाचित्रकार म्हणून त्यांनी काम केले. दिवाळी अंक, साप्ताहिकांच्या मुखपृष्टांवर त्यांनी काढलेली चित्रे, छायाचित्रे प्रसिद्ध झाली. ‘सौंदर्य लतिका’ हा विषय घेऊन त्यांनी स्त्री सौंदर्याची रूपे कॅनव्हासवर चितारली व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रदर्शने भरवली. काही पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. चित्रांकृतींना मिळणारा रसिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन बेंद्रे यांनी चित्रे, पुस्तके प्रकाशित केली. चित्रकार प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, प्रशांत जाधव, दारा सरदार, विलास बकरे यांच्यासह चित्रकार व छायाचित्रकारांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. रक्षाविसर्जन शनिवारी होणार आहे. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ चित्रकार गोविंद बेंद्रे यांचे निधन
By admin | Updated: May 8, 2015 00:42 IST