कोल्हापूर : शहरात चेन स्नॅचरसह मोटारसायकली चोरीच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबरच्या मोटारसायकलींवर कठोर कारवाई करण्याची मोहीम आज, सोमवारपासून सुरू केली. दिवसभरात १३४ वाहनांवर गुन्हे दाखल करून १३ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. तर २८ वाहनांना जाग्यावर नवीन नंबर प्लेट बसविण्यात आल्या, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी दिली. शहरात मोटारवाहनांचा वापर करून वाहनांच्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग, पिक पॉकेटिंग, अपहरण व अपघात यासारख्या गुन्ह्यांत गुन्हेगार वेगवेगळ्या मोटारवाहनांचा वापर करीत असल्याचे उघड झाले आहे. तसेच काही वाहनचालक वाहनांवर नंबर घालत नाहीत किंवा ओळखून येणार नाही, असे दादा, मामा, राज, राम, आई, भाई, अमर, सर, राऊत, पवार, मराठा, पाटील अशा प्रकारचे वेडेवाकडे फॅन्सी नंबर घालतात. गुन्हेगारांनी वाहनांची चोरी केल्यानंतर ते पळून जाताना वापरात आणलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट ओळखता येत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन बहुतांशी महाविद्यालयीन युवक करताना दिसून आले आहेत. अपघात व चेन स्नॅचिंग किंवा चोरींचे गुन्हे रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांच्यावतीने फॅन्सी नंबरवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली. दरम्यान, शहरातील शिवाजी पूल, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, सायबर चौक, आदी ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. सुमारे २८ फॅन्सी नंबर असलेल्या वाहनधारकांना अडवून त्या नंबर प्लेटा काढून जाग्यावर नवीन अवघ्या ५० रुपयांत बसविण्यात आल्या. तर बेकायदेशीर वाहन चालविणाऱ्या १३४ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करून १३ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. गेल्या सात महिन्यांत वाहतूक शाखेने २४६४ गुन्हे दाखल करून दोन लाख ४६ हजार रुपये दंड वसूल केला. (प्रतिनिधी)
वाहनांवरील फॅन्सी नंबर हद्दपार
By admin | Updated: August 26, 2014 00:15 IST