मूर्ती व कलश मिरवणूकः सोनगेत चैतन्य बहरले,उद्या मुख्य दिवस
म्हाकवे : सोनगे (ता.कागल)येथील श्री चौंडेश्वरी देवीच्या मंदिराचा लोकवर्गणी व श्रमदानातून गावकऱ्यांनी जीर्णोध्दार केला आहे. या मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहन सोहळ्याला आजपासून प्रारंभ झाला असून मंगळवारी मुख्य दिवस आहे. या सोहळ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी गणेश मंदिरापासून देवदेवतांच्या मूर्तीसह कलश व पालखी मिरवणूक सवाद्य पार पडली. यामध्ये गावातील सर्व महिला पाणी, आंबिल कलश डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी वास्तुशांती होमहवन व धार्मिक विधी पार पडले. मंदिरावर केलेली विद्युतरोषणाई,गाभाऱ्याची फुलांच्या माळांनी केलेली सजावट,भव्य मंडप यामुळे गावकरी सीनहार झाले आहेत.
दरम्यान, आज सोमवारी सकाळी ९वा. मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर मंगळवारी या सोहळ्याचा मुख्य दिवस असून यादिवशी सकाळी कणेरी मठाचे प.पु.अदृश्य काडसिध्देश्वर स्वामींजी यांच्या हस्ते व प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या उपस्थितीत कलशारोहण होणार आहे.
सोनगेत भावभक्तीला उधाण..
गावकऱ्यांनी रुपयांपासून लाखापर्यंत लोकवर्गणी स्वयंस्फूर्तीने जमा करून तब्बल ८० लाखाचे भव्य दिव्य मंदिर उभारले आहे.तसेच,मंडळांंच्या तरुणांसह गावकऱ्यानी श्रमदान केल्याने मंदिराप्रती प्रचंड आत्मियता निर्माण झाली आहे. ग्रामदेवतेचा सोहळा थाटामाटात करण्याच्या उद्देशाने गावकऱ्यांनी तीन दिवस सर्व कामे बाजूला ठेवत पाळक पाळला आहे.
सोनगे येथे देवदेवतांच्या मूर्ती व कलशाच्या निघालेल्या मिरवणुकीत पाण्याचे कलश घेऊन सहभागी झालेल्या महिला व भाविक
छाया-रोहित लोहार, सोनगे