सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कलम ८८च्या चौकशीवरील स्थगितीसंदर्भातील अंतिम निर्णय उद्या, बुधवारी घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. रायपूर येथील परिषदेमुळे एक दिवस हा निर्णय लांबणीवर गेला. वसंतदादा व जिल्हा बँकेच्या कलम ८८ च्या चौकशीला तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्थगिती दिली होती. याप्रकरणी आता नव्या सहकारमंत्र्यांसमोर सुनावणी झाली आहे. आज, मंगळवारी याबाबतचा निर्णय सहकार मंत्र्यांमार्फत घेतला जाणार होता; मात्र ते रायपूर (छत्तीसगड) येथील परिषदेत अडकल्यामुळे उद्या अंतिम निर्णय होणार आहे. चौकशीचा मार्ग खुला होणार, की स्थगिती कायम राहणार, याकडे लक्ष लागले आहे. चौकशीचा मार्ग खुला झाल्यास तत्कालीन संचालकांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. वसंतदादा बँकेच्या माजी संचालकांच्यावतीने सोमवारी सहकारमंत्र्यांकडे लेखी म्हणणे सादर केले आहे. जिल्हा बँकेच्या माजी संचालकांनी यापूर्वीच म्हणणे सादर केल्याने आता सहकारमंत्र्यांमार्फत निर्णय घेतला जाईल. (प्रतिनिधी)
‘वसंतदादा’, जिल्हा बँकेचा आज फैसला
By admin | Updated: January 14, 2015 00:34 IST