वरद रवींद्र पाटील खून प्रकरणाची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेतली. दीडच्या सुमारास अपहरण झालेल्या कु. वरदचा मृतदेह सापडल्याची बातमी समाजमाध्यमांमधून समजली. मंत्री मुश्रीफ यांनी दीडच्या सुमाराला मुरगूडचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना फोन करून माहिती घेतली; तसेच कसोशीने तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी त्यांना दिल्या. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून माणुसकीला काळिमा फासणारी ही गोष्ट आहे. जे कोणी आरोपी या गुन्ह्यात असतील, त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असेही मुश्रीफ म्हणाले
खुनाचे नेमके कारण लवकरच स्पष्ट
सोनाळी (ता. कागल) येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास वरदवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेबाबत अधिक माहिती दिली. आरोपीने खुनाची कबुली दिली असून नेमके कारण सांगता येत नसल्याचे सांगितले. घटना नरबळी असू शकते का, याबाबतही स्पष्ट माहिती देता येत नसल्याचे सांगून घटनास्थळावरील साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे; तर मग नाजूक संबंधातून खून झाला का, या प्रश्नावरही शनिवार दुपारपर्यंत या खुनाचे कारण समजेल, असे त्यांनी सांगितले.