लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने बुधवारी महापालिकेच्या शहरातील अकरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे ४७०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. बुधवारी करण्यात आलेल्या लसीकरणात ४३ हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाइन वर्कर, १८ ते ४५ वर्षापर्यंत ३६०८, ४५ ते ६० वर्षावरील ७६१ तर ६० वर्षांवरील २९६ नागरिकांचा समावेश आहे.
आज, गुरुवारी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्टेशन केले आहे. त्यांनीच महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे. गुरुवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थ नगर, मोरेमाने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.