कदमवाडी : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांत १४९९५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांची कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यासाठी गर्दी होत आहे.
लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत आहे. सेवा रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी पहाटे ५ वाजल्यापासून रांगा लागत आहेत. या केंद्रावर दररोज १०० चे उद्दिष्ट असताना इथे रोज ६००-६५० नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून सोमवारी, २६ एप्रिलपर्यंत १५ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून या लसीकरण मोहिमेसाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उमेश कदम यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
तरुणांचीही मदत
रुग्णालयात लसीकरणासाठी होणारी गर्दी व वाढते ऊन लक्षात घेऊन भागातील सामाजिक कार्यकर्ते निवास जाधव, योगेश निकम युवा मंच व शिवप्रेमी मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनी रुग्णालय परिसरात मंडप, बसण्यासाठी बैठक व्यवस्था, सकाळच्या सत्रात नागरिकांसाठी नाष्टा, पाणी व रांगेचे नियोजन करत आहेत.
पोलीस बंदोबस्त नेमण्याची गरज
लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांगा लागत आहेत. १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण केले जाणार असून त्यावेळी तरुणांकडून लसीकरण केंद्रावर हुल्लडबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शासनाकडून लस वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अशावेळी गोंधळ होण्याची शक्यता असल्याने या केंद्रावर पोलीस बंदोबस्त नेमण्याची गरज आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांमुळे गोंधळ
लसीकरण करण्यासाठी जे शासकीय सेवेतील कोविड योध्दे आहेत, त्यांना लसीकरणासाठी त्यांच्या कार्यालयाकडून वेळ दिला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता कार्यालयाने सक्ती केल्यावर लसीकरणासाठी नंबर न लावता ओळखपत्र दाखवून ते सरळ लसीकरण केंद्रात घुसत असल्याने गोंधळ होत आहे.
कोट :
जास्तीत जास्त लोकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, जेणेकरून गर्दी टाळता येईल व नागरिकांचा वेळ वाचेल. जे नागरिक ऑनलाईन नोंदणी करतील, त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
- डाॅ. उमेश कदम. वैद्यकीय अधीक्षक.
सेवा रुग्णालय.
फोटो : २७ सेवा रुग्णालय
ओळ
सेवा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी वाढत असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम हे स्वत: नागरिकांची नोंदणी करत आहेत. (छाया - दीपक जाधव)