सदाशिव मोरे । आजरा
: आजरा तालुक्यातील आरोग्य सेवा रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक व सेविका ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांना दुप्पट कामे करावी लागत आहेत. वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गाबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची गरज आहे.
आजरा तालुका मागास व डोंगराळ भागात विखुरलेला आहे. अद्यापही अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर दळणवळणाच्या साधनांअभावी आरोग्यसेवा पोहोचली नाही. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक व सेविका ग्रामीण भाग असल्यामुळे याठिकाणी काम करण्यास इच्छुक नसतात. भरलेली पदे ही पदोन्नतीवर शहरी भागात जातात. मंजूर ११९ पदांपैकी तब्बल ४६ पदे रिक्त आहेत.
वाटंगी व भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राला एकच वैद्यकीय अधिकारी आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांना २४ तासांची सेवा पार पाडावी लागत आहे. त्यातच कोरोनामुळे उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.
तालुक्यात २ वैद्यकीय अधिकारी, १ औषध निर्माण अधिकारी, ४ आरोग्य सहायक, २४ आरोग्यसेवक व सेविका, २ कनिष्ठ सहायक, ४ वाहनचालक, ९ परिचर अशी एकूण ४६ पदे रिक्त आहेत. तालुक्यातील १ लाख २० हजार लोकांचे आरोग्य फक्त ७३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हातात आहे.
तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २७ उपकेंद्रे आहेत. उपकेंद्रांतील २७ पैकी ४ पदे अद्यापही रिक्त आहेत.
उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावातील सर्व्हे करणे, कोरोनाबाबत प्रबोधन करणे, कोरोनाची लस घेण्याबाबत विनंती करणे, सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार करणे, गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाणे व उपचार करणे यासह विविध कामे करावी लागत आहेत. कोरोनाच्या काळात सर्व कामे जीव धोक्यात घालून करावी लागत आहेत. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरल्यास रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य आहे.
--
* तालुक्यात ३८ दिवसांत ३१ जणांचा मृत्यू
आजरा तालुक्यात १ एप्रिलपासून कोविड केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात आजपर्यंत २४८५ पैकी १५६३ जण निगेटिव्ह, तर ९२२ पॉझिटिव्ह आले आहेत. ३१ जणांचा कोविड सेंटर व खासगी दवाखान्यात मृत्यू झाला आहे. अजूनही ४९७ जणांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. गेल्यावर्षी वर्षभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत नागरिकांनी दक्षता न घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचा आकडा वाढत आहे.