जयसिंगपूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असतानासुद्धा शहरी तसेच ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत आहे. गावपातळीवर या निधीचा वापर करताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विकासकामांच्या निधीचा वापर गावाच्या विकासासाठी करावा, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, टाकळी येथे विकासकामांचे उद्घाटन मंत्री यड्रावकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री यड्रावकर म्हणाले, ग्रामीण भागातही गावांचे मोठ्या प्रमाणात विस्तारिकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या गरजा वाढत आहेत. ग्रामपंचायतीसमोर असलेल्या आर्थिक अडचणींमुळे ग्रामपंचायतीकडून नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणे शक्य होत नसते. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांमधून गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून आणावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.
सैनिक टाकळी येथे पं. स. सभापती दीपाली परीट, सरपंच हर्षदा पाटील, उपसरपंच सुदर्शन भोसले, डी. आर. पाटील, हरिश्चंद्र पाटील, रणजित पाटील, सुधीर पाटील उपस्थित होते; तर खिद्रापूर येथे सरपंच हैदरखान मोकाशी, द्वारपाल लडगे, उपसरपंच निर्मला मांजरे, सलीमखान मोकाशी, आजम चौगुले, दिलीप पाटील, शिवाजी ठोंबरे, सुकुमार पाटील, डॉ. राजगोंडा पाटील, ताहीरखान मोकाशी, गीता पाखरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १२०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले.